लखनौ, (वृत्तसंस्था) २३ जून - उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलिगंज येथील पुरानिया परिसरात आज (सोमवारी) एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. येथील एका व्यावसायिक इमारतीमधील दुकान आणि कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृत पावलेले सर्वजण विद्यार्थी असून, त्यांचे वय अंदाजे २० ते २४ वर्षांच्या दरम्यान आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरानिया परिसरातील एका व्यावसायिक इमारतीला अचानक आग लागली. या इमारतीमध्ये कोचिंग सेंटरव्यतिरिक्त एक 'पेट शॉप' (प्राण्यांचे दुकान) आणि इतर व्यावसायिक दुकाने आहेत. आग लागली तेव्हा कोचिंग सेंटरमध्ये अनेक विद्यार्थी उपस्थित होते. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे इमारतीतून बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाले आणि अनेक जण आत अडकले.
बचावासाठी पहिल्या मजल्यावरून उड्या
आगीचे लोळ आणि धुराचे साम्राज्य पसरल्याने कोचिंग सेंटरमध्ये एकच चेंगराचेंगरी आणि गोंधळ उडाला. आगीच्या ज्वालांमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी थेट पहिल्या मजल्यावरून खाली उड्या घेतल्या. यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले. तब्बल एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, आग विझवल्यानंतर आतून १४ विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, अशी माहिती 'एनडीटीव्ही'ने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आली आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.