मुंबई, (प्रतिनिधी) २२ जून - "माझ्यासोबतच्या बैठकीला एक नाही, तर तब्बल सहा 'टायगर' उपस्थित आहेत. यामध्येही 'ट्रीपल संजय' आहेत, त्यामुळे बाकीच्या संजयबद्दल बोलण्याची गरजच उरलेली नाही," असा टोला लगावत आजच्या बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेशाची सुरुवात शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. "शिवसेना हा एक परिवार आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत कट्टर शिवसैनिक दाखल झाले आहेत, त्या सर्वांचे मी पक्षात मनापासून स्वागत करतो," अशा शब्दांत शिंदे यांनी सर्व खासदारांना शिवसेनेत प्रवेश दिला.
२०२२ च्या उठावाचा हा 'दुसरा टप्पा'
पक्षप्रवेश सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले, "शिवसेना हे एक कुटुंब आहे, परिवार आहे. चार वर्षांपूर्वी २२ जून २०२२ रोजी आम्ही शिवसेनेमध्ये ऐतिहासिक उठाव केला होता. त्यावेळी सुरुवातीला ४० आमदार आमच्यासोबत आले होते. त्यानंतर आता चौकार नाही, तर थेट षटकार मारला आहे. २०२२ साली शिवसेना पक्ष, धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी आम्ही तो उठाव केला होता; आणि आज या उठावाचा हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे."
तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार: शिंदेंची ग्वाही
खासदार आणि नेत्यांना विश्वास देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, "तुम्ही सर्वजण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या खऱ्या शिवसेनेत आला आहात. हे सर्वजण आपापल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आमच्यासोबत आले आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच जनतेच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देतो. आम्ही कधीही अर्धवट ऑपरेशन करत नाही, आमचे ऑपरेशन पूर्ण झाले आहे! तुमच्यापैकी कोणालाही आमच्यासोबत आल्याचा पश्चाताप होणार नाही. पक्षात सर्वांचा योग्य तो सन्मान राखला जाईल आणि लोकांच्या सेवेसाठी मी तुमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहीन."
येत्या लोकसभेला सर्वजण 'धनुष्यबाणा'वर लढणार
"आज पक्षात दाखल झालेले सर्व खासदार आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील. ते सर्वजण 'धनुष्यबाण' या चिन्हावर निवडणूक लढवतील आणि मोठ्या मताधिक्याने निवडूनही येतील," अशी महत्त्वाची घोषणाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. सर्व नवनियुक्त खासदारांच्या पाठीशी संपूर्ण पक्ष ताकदीने उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.