धुळे-नाशिक बसमधील २३ लाखांची मोठी चोरी उघड... ३ सराईत महिला चोरट्यांना बेड्या...

Share:
Main Image
Last updated: 22-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ जून - धुळे-नाशिक बस प्रवासादरम्यान प्रवाशाच्या बॅगेतून तब्बल २३ लाख रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा महिला चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाला मोठे यश आले आहे. धुळे-नाशिक महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजचा कसून तपास करत पोलिसांनी ओझर विमानतळ रस्त्यावरील पालावर छापा टाकून या तीन महिलांना अटक केली. पुढील तपासासाठी त्यांना गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयित महिला:

१. लागम्मा उलगय्या गड्डी (वय ५०, रा. चिकलठाणा, जि. छत्रपती संभाजीनगर)

२. मंजूला मल्लेश किलीप (वय २५, रा. भवलरोड, सोलापूर)

३. पुजा व्यंकटेश किलीप (वय २६, रा. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर)

२३ लाखांच्या ऐवजावर मारला होता डल्ला

याप्रकरणी धुळे येथील सुनील शिवराम येवले (रा. सूर्यमुखी हनुमान मंदिराजवळ, अहिल्यादेवी नगर, धुळे) यांनी फिर्याद दिली होती. येवले दांपत्य गेल्या मंगळवारी (दि. ९) धुळे-शहादा या बसने नाशिकमध्ये आले होते. या प्रवासादरम्यान उमराणे ते पिंपळगाव बसवंत दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बॅगेची चेन उघडून आतील रोख रक्कम आणि मौल्यवान सोन्याचे अलंकार असा एकूण २३ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. नाशिकमध्ये नातेवाईकांच्या घरी पोहोचल्यानंतर बॅगेतील चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisement

सीसीटीव्ही आणि रिक्षाचालकाचा माग काढत पोहोचले ओझरला

या मोठ्या चोरीचा समांतर तपास गंगापूर पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट ३ चे पथक करत होते. पथकाने धुळे-नाशिक मार्गावरील उमराणे ते पिंपळगाव दरम्यानचे सलग तीन दिवस विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या पाहणीत संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन महिला बसमधून उतरून एका रिक्षात बसून पसार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पथकाने तातडीने त्या रिक्षाचालकाचा शोध घेतला. रिक्षाचालकाच्या माहितीवरून संशयित महिला ओझर शिवारातील विमानतळ रस्त्यावर पाल (तात्पुरती झोपडी) टाकून राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी (दि. १९) सीसीटीव्ही फुटेजमधील पेहरावावरून या तिघींना ताब्यात घेतले.

ओळख परेडमध्ये गुन्ह्याची कबुली

सुरुवातीला पोलीस तपासात संशयित महिलांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी तक्रारदार येवले दांपत्याला नाशिकमध्ये पाचारण करून या महिलांची ओळख परेड घेतली. दांपत्याने महिलांना ओळखल्यानंतर या चोरीचा गुंता सुटला.

कारवाई करणारे पोलीस पथक :

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके व वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश नडविनकेरी, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, दिलीप सगळे, जमादार सुहास क्षिरसागर, हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, अंमलदार भगवान जाधव, चारूदत्त निकम, सविता कदम, मयुर पवार आणि अनिल गाढवे यांच्या पथकाने केली.

Advertisement

Comments

No comments yet.