जळगाव, (प्रतिनिधी) २२ जून - महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन विजयी झाले. या निवडणुकीत एकूण ६१६ मतदानापैंकी एकूण ६११ वैध मते नोंदविण्यात आली होती. त्यापैकी नंदकिशोर महाजन यांना सर्वाधिक ५८२ मते मिळाली.
अन्य उमेदवारांमध्ये तायडे शरद शामराव यांना १७ मते, अनिल छबिलदास चौधरी यांना ११ मते तर रेश्मा कुंदन काळे यांना १ मत मिळाले. याशिवाय ५ मते अवैध ठरली. मतमोजणीदरम्यान टेबल क्रमांक १ वर श्री. महाजन यांना २०७, टेबल क्रमांक २ वर १९१ आणि टेबल क्रमांक ३ वर १८४ अशी एकूण ५८२ मते मिळाली.
मतमोजणीनंतर भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते विजयी उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
म्हणून मिळाला दणदणीत विजय
नंदकिशोर यांना भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या स्थानिक प्रतिनिधींचा मोठा पाठिंबा मिळाल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीपूर्वी महायुतीकडून संख्याबळावर विश्वास व्यक्त करण्यात आला होता. आता निकालानंतर तो दावा खरा ठरला आहे. नंदकिशोर महाजन यांच्या विजयानंतर जळगावात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. जळगावमध्ये शिंदे गटाने भाजपच्या उमेदवारीसाठी पूर्ण ताकदीनिशी काम केल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महायुतीने विजय मिळवला. तब्बल वीस वर्षांच्या पक्षनिष्ठेची पावती म्हणून पक्षाने ही उमेदवारी दिल्याची भावना नंदकिशोर यांनी व्यक्त केली होती. नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात थेट लढत झाल्याने जळगावच्या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून होतं. मतमोजणी केंद्र परिसरात सकाळपासूनच राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींची मोठी गर्दी पहायला मिळाली