मुंबई/नाशिक, (प्रतिनिधी) २२ जून - महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीचा अंतिम फैसला आज, सोमवार २२ जून रोजी होणार आहे. राज्यातील एकूण १७ जागांसाठी निवडणूक घोषित झाली होती, त्यापैकी ६ जागांवर आधीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित ११ जागांसाठी झालेल्या चुरशीच्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी सुरू होत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ऐनवेळी घेतलेल्या माघारीमुळे निवडणूक कमालीची गाजली असून, आजच्या निकालात महाविकास आघाडीला खिंडार पडणार की ते चमत्कार घडवणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पसंतीक्रमानुसार होणाऱ्या या मतदानात कुठेही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीने कडक 'व्हिप' जारी केला असल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आज कोणत्या ११ जागांची मतमोजणी?
आज सकाळी मतमोजणीला प्रारंभ होत असून यामध्ये सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर (पोटनिवडणूक), भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या ११ मतदारसंघांचा समावेश आहे.
अमरावतीचा फैसला 'पहिल्या पसंती'वरच? दोन तासांत निकाल!
अमरावती आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी चोख प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमरावतीत चार टेबलांवर ही प्रक्रिया होणार असून, पहिल्या पसंतीच्या मतांवरच निकाल लागल्यास अवघ्या दोन तासांत म्हणजेच दुपारी १२ वाजेपर्यंत अमरावतीचा नवा आमदार निश्चित होईल. येथे भाजपचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांच्यात थेट तिरंगी लढत आहे. महायुतीचे संख्याबळ पाहता भाजपचे पोटे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
नाशिकमध्ये 'दराडे विरुद्ध गीते' थेट लढत
नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ अर्ज मागे घेण्याच्या दिवसापासूनच सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून माजी आमदार नरेंद्र दराडे यांना महायुतीने मैदानात उतरवले आहे, मात्र भाजपचे गोकुळ गीते यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीचा जोड कायम ठेवला अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेतली. पण त्यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
६ जागांवर महायुतीचे वर्चस्व (बिनविरोध विजयी):
मविआच्या ऐनवेळच्या माघारीमुळे ६ जागांवर निवडणूक बिनविरोध झाली असून, यात महायुतीचे पारडे जड राहिले आहे. (ठाणे: रवींद्र फाटक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग: अनिकेत तटकरे, पुणे: विक्रम काकडे, यवतमाळ: दुष्यंत चतुर्वेदी, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली: अरुण लखाणी आणि आणखी एक जागा).
'या' प्रमुख जागांवर उत्सुकता शिगेला:
धाराशिव-लातूर-बीड: महायुतीचे बसवराज पाटील (भाजप) आणि महाविकास आघाडीचे महेश देशमुख (काँग्रेस) यांच्यात थेट सामना आहे.
छत्रपती संभाजीनगर-जालना: सुहास शिरसाट (भाजप) आणि गणेश लोखंडे (शिवसेना - ठाकरे गट) आमने-सामने आहेत.
नागपूर पोटनिवडणूक: अतुल लोंढे (काँग्रेस) यांच्या विरोधात महायुतीचे डॉ. राजीव पोतदार यांच्यात लढत होत आहे.
'व्हिप'मुळे बंडखोरांचे धाबे दणाणले!
पसंतीक्रमाच्या मतदानात महायुतीचा अधिकृत उमेदवार बाद झाल्यास इतर कोणालाही मतदान करू नये, असा कडक व्हिप बजावण्यात आला आहे. व्हिपचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याने मतफुटी रोखण्यात महायुतीला किती यश येते, हे आज स्पष्ट होईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निकालांचे संकेत राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.