उद्धव यांच्या सोबत राहणार की शिंदेंकडे जाणार? खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 21-Jun-2026

धाराशिव, (प्रतिनिधी) २१ जून - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे आक्रमक खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर मोठा राजकीय निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. धाराशिवमधील गोवर्धन वाडी येथे रविवारी (दि. २१) झालेल्या कार्यकर्त्यांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर त्यांनी माध्यमांसमोर येत ही अधिकृत घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची घोषणा झालेली असतानाच, ऐनवेळी ओमराजेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुमारे तीन ते चार तास चाललेल्या या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर ओमराजेंनी आपल्या या निर्णयाची पार्श्वभूमी स्पष्ट केली.

सत्तेत जाण्याचा निर्णय का घेतला? ओमराजेंनी सांगितले कारण:

आपल्या निर्णयाचे समर्थन करताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, "गेल्या काही काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत असताना सत्तेअभावी आमच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले नाही. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवूनही सत्तेच्या दबावामुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. तसेच मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे वडील दिवंगत पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणाच्या खटल्यात सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, या विविध कारणांमुळे आपण सत्ताधारी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे."

Advertisement

'मातोश्री'बद्दल कृतज्ञता; कार्यकर्त्यांना दिला मोलाचा सल्ला

पक्षांतर करत असतानाही ओमराजे यांनी ठाकरे कुटुंबीयांबद्दल अत्यंत भावनिक आणि कृतज्ञतापूर्वक भावना व्यक्त केल्या. "आदरणीय बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी आणि आदित्य ठाकरे यांचे मला नेहमीच प्रेम, आशीर्वाद आणि स्नेह लाभला. मी पक्षांतर करत असलो तरी माझ्या मनात त्यांच्याबद्दल कधीही वाईट शब्द येणार नाहीत. समोरून कशीही टीका किंवा कमेंट्स आल्या, तरी आपल्या बाजूने 'मातोश्री'बद्दल एकही उलट शब्द जायला नको, अशी सक्त सूचना मी माझ्या सर्व शिवसैनिकांना आणि कार्यकर्त्यांना केली आहे," असे म्हणत त्यांनी ठाकरेंचे आभार मानले.

राणा जगजितसिंह पाटलांशी राजकीय संघर्ष कायम!

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महायुतीमधील समीकरणे बदलणार असली, तरी आपले पारंपरिक राजकीय वैरी आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी असलेला विरोध कायम राहील, असे ओमराजेंनी स्पष्ट केले. "मी पक्षात आलो असलो तरी अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना माझा विरोध कायम असेल. माझा पुढील राजकीय प्रवास केवळ सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठीच सुरू राहील," असा टोलाही त्यांनी लगावला.

Advertisement

Comments

No comments yet.