नाशिक, (प्रतिनिधी) २१ जून - डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात वेगाने वाटचाल करणाऱ्या ‘सुपरफास्ट नाशिक’ या वेब न्यूज पोर्टलने अवघ्या पाच महिन्यांत ५ लाख व्ह्यूजचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. अल्पावधीतच एवढे मोठे यश मिळविणाऱ्या मोजक्या वेब न्यूज पोर्टलमध्ये ‘सुपरफास्ट नाशिक’चा समावेश झाला असून या यशाचे श्रेय वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना देण्यात आले आहे.
एबीव्ही मल्टीमिडीया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे सुरू करण्यात आलेले ‘सुपरफास्ट नाशिक’ हे पोर्टल नाशिक शहर, जिल्हा, महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अचूक, जलद आणि विश्वासार्ह वार्तांकन करत आहे. राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक प्रश्न, कृषी, पर्यावरण, क्रीडा, मनोरंजन आणि विकासात्मक पत्रकारिता यांसारख्या विविध विषयांवरील बातम्यांना वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
‘घटना-घडामोडींचा डिजिटल आरसा’ या ब्रीदवाक्याने सुरू झालेल्या या पोर्टलने सत्यता, विश्वासार्हता आणि वाचकस्नेही मांडणी या तत्त्वांवर भर दिला आहे. फेक न्यूजच्या वाढत्या युगात तथ्यांची पडताळणी करूनच बातम्या प्रसिद्ध करण्याच्या भूमिकेमुळे वाचकांचा विश्वास संपादन करण्यात पोर्टलला यश आले आहे.
‘सुपरफास्ट नाशिक’चे मुख्य संपादक भावेश ब्राह्मणकर यांना प्रिंट, रेडिओ, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातील पत्रकारितेचा दोन दशकांहून अधिक अनुभव आहे. दै. सकाळ, ई टीव्ही मराठी, दै. लोकमत, दै. महाराष्ट्र टाइम्स तसेच राजधानी नवी दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले आहे. पर्यावरण, विज्ञान, संरक्षण आणि सामाजिक विषयांवरील त्यांचे लेखन विशेष गाजले आहे.
ई पेपर आणि साप्ताहिकाला पसंती
बदलत्या काळाचा वेध घेत ‘सुपरफास्ट नाशिक’चा डिजिटल ई-पेपर आणि मराठी साप्ताहिक सुपरफास्ट नाशिक मेलही वाचकांच्या पसंतीस उतरत असून त्यालाही झपाट्याने प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात अधिक व्यापक आणि प्रभावी पत्रकारितेद्वारे वाचकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे.
“विकासात्मक पत्रकारितेवर माझा नेहमीच भर राहिला आहे. सत्याचा शोध घेऊन तो निर्भीडपणे मांडणे ही आमची भूमिका आहे. वाचकांनी दाखविलेला विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद असून आगामी काळातही ताज्या, दर्जेदार आणि विश्वासार्ह बातम्या देण्यासाठी आमची संपूर्ण टीम कटिबद्ध आहे.”
- भावेश ब्राह्मणकर, मुख्य संपादक