नाशिक, (प्रतिनिधी) २१ जून - शहरात बेकायदेशीर गावठी कट्ट्यांची (पिस्तूल) राजरोसपणे खरेदी-विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने हिरावाडी भागात सापळा रचून पिस्तूलची देवाणघेवाण करणाऱ्या दोघांना रंगेहात अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पिस्तूल खरेदी करणाऱ्या तिसऱ्या सराईत गुन्हेगारालाही बेड्या ठोकल्या. संशयितांकडून ३ देशी बनावटीची पिस्तूल आणि जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेले संशयित:
१. आकाश चंद्रकांत काळे (वय २७, रा. त्रिकोणी बंगला, हिरावाडी रोड) – पिस्तूल विक्रेता
२. गोरख सदाशिव तुपलोंढे (वय ३०, रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) – खरेदीदार (सराईत गुन्हेगार)
३. रोहित निलेश नेवारे (वय २९, रा. बेथलेनगर, शरणपूर रोड) – खरेदीदार (सराईत गुन्हेगार)
अशी झाली पोलिसांची कारवाई
हिरावाडीतील त्रिकोणी बंगला परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ एक तरुण गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी (दि. १८) या परिसरात सापळा रचला.
संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या आकाश काळे आणि गोरख तुपलोंढे यांना पथकाने ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्याकडे काडतुसांनी भरलेले दोन गावठी कट्टे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक केली.
तपासात उघड झाला तिसरा ग्राहक
पोलिसी खाक्या दाखवताच मुख्य संशयित आकाश काळे याने तो पिस्तूल विक्रेता असल्याचे कबूल केले. तसेच, काही दिवसांपूर्वीच त्याने रोहित नेवारे यालाही एक पिस्तूल विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवून रोहित नेवारे याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याच्या ताब्यातून तिसरे पिस्तूल हस्तगत केले. अटक करण्यात आलेल्यांपैकी तुपलोंढे आणि नेवारे हे दोघे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक:
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके व युनिटचे निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रेय पोटे, हवालदार महेश साळुंके, उत्तम पवार, रविंद्र आढाव, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, धनंजय शिंदे, मुख्तार शेख, नाझीमखान पठाण व किरण शिरसाठ यांच्या पथकाने केली.