मुंबई, (प्रतिनिधी) २० जून - कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात राज्यातील शिक्षकांना आधुनिक कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक मोठे पाऊल उचलले आहे. राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांमधील ४ लाखांहून अधिक शिक्षकांना प्रगत प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि 'गुगल फॉर एज्युकेशन' यांच्यात मंत्रालयात एका महत्त्वपूर्ण उद्देशपत्रावर (MoU) स्वाक्षरी करण्यात आली. पुढील दीड वर्षांत ही प्रशिक्षण मोहीम राबवली जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी या उद्देशपत्रावर स्वाक्षरी केली. या सोहळ्याला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि प्रधान सचिव रणजितसिंह देओल प्रामुख्याने उपस्थित होते.
मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचणार तंत्रज्ञान
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, बदलत्या काळात शिक्षकांना डिजिटल कौशल्यांनी सक्षम करणे ही काळाची गरज आहे. या कराराअंतर्गत:
ट्रेनिंग मॉडेल: पहिल्या टप्प्यात राज्यातील निवडक शिक्षकांना 'मास्टर ट्रेनर्स' म्हणून प्रशिक्षित केले जाईल. त्यानंतर हे शिक्षक राज्यभरातील इतर शिक्षकांना ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’ अंतर्गत प्रशिक्षण देतील.
विनामूल्य सुविधा: या संपूर्ण उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. गुगलमार्फत हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे.
डिजिटल सुरक्षितता: शिक्षकांच्या डिजिटल सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली असून या प्रक्रियेवर महाराष्ट्र शासनाचे नियंत्रण असणार आहे.
मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून प्रशिक्षण सामग्री
शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, २१ व्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी हे प्रशिक्षण शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही फायदेशीर ठरेल. या उपक्रमांतर्गत शिक्षकांमध्ये एआय साक्षरता वाढवणे, डिजिटल कौशल्ये विकसित करणे आणि शिक्षकांना सुरक्षित डिजिटल ओळख प्रदान केली जाईल. विशेष म्हणजे या प्रशिक्षणाची सामग्री मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.
डिजिटल पायाभूत सुविधांना मिळणार बळकटी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP) च्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या या उपक्रमामुळे राज्यातील शाळांमधील आयसीटी प्रयोगशाळा, कनेक्टेड वर्गखोल्या, स्मार्ट क्लासरूम, डिजिटल ग्रंथालये आणि भाषा प्रयोगशाळा यांसारख्या आधुनिक सुविधांना मोठी बळकटी मिळणार आहे.
या कार्यक्रमाला गुगल फॉर एज्युकेशनचे वरिष्ठ अधिकारी संजय जैन यांच्यासह शिक्षण विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या करारामुळे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचा दर्जा जागतिक पातळीवर पोहोचण्यास मदत होणार आहे.