साक्री तालुक्यातील दोन ढाब्यांच्या मागे सुरू होता हा गंभीर प्रकार... तिघांना रंगेहात पकडले...

Share:
Main Image
Last updated: 20-Jun-2026

धुळे, (प्रतिनिधी) २० जून - गुजरात-धुळे महामार्गावर टँकरमधून अवैधरित्या गॅस आणि डिझेलची चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे. दोन दिवस सलग पाळत ठेवून केलेल्या या धडक कारवाईत भारत पेट्रोलियमचा एलपीजी गॅस टँकर, एचपी कंपनीचा डिझेल टँकर आणि १४० व्यावसायिक सिलिंडरसह तब्बल १ कोटी ५५ लाख ९५ हजार ११४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवल गावाजवळ असलेल्या सुरत-धुळे महामार्गावरील 'अन्नपूर्णा ढाबा' आणि 'पार्श्वनाथ ढाबा' यांच्या मागील परिसरात हा अवैध काळाबाजार सुरू होता. टँकरमधून इंधनाची चोरी करून ते अवैध बाजारात विकले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य दक्षता पथकाने तिथे सापळा रचला होता.

दोन मोठे टँकर आणि गाड्या जप्त

छाप्यादरम्यान पथकाने गॅस आणि डिझेल टँकरमधून इंधनाची अवैध चोरी सुरू असतानाच आरोपींना पकडले. या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:

Advertisement

एलपीजी टँकर (GJ-06-AZ-4430): १७.४२ मेट्रिक टन एलपीजी गॅससह टँकर जप्त.

डिझेल टँकर (GJ-12-BZ-7999): ३५ किलोलीटर डिझेलसह टँकर जप्त.

इतर वाहने व साहित्य: एक बोलेरो पिकअप गाडी, एक छोटा ट्रक, १४० व्यावसायिक गॅस सिलिंडर, गॅस भरण्याचे नॉझल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे आणि ड्रममध्ये साठवून ठेवलेले डिझेल.

दक्षता पथकाची कामगिरी

अवैध इंधन आणि गॅस चोरीविरोधातील ही उत्तर महाराष्ट्रातील अलीकडील काळातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. ही कामगिरी राज्य दक्षता पथकातील अधिकारी दीपेंद्र परुळेकर, अमोल बुरटे, पवन कुंबले, रवींद्र राठोड, राजेश सोरते, राहुल इंगळे, देवानंद इंगळे आणि राजीव भेले यांच्या पथकाने बजावली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.