सातपूर पोलिसांचा 'डबल धमाका'... दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद... या गंभीर गुन्ह्यांची उकल...

Share:
Main Image
Last updated: 20-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० जून - सातपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (डीबी) शहरात सक्रिय असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. या सराईत चोरट्यांच्या अटकेमुळे सातपूर परिसरातील जबरी चोरीचा १ आणि घरफोडीचे २ असे एकूण तीन गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या ताब्यातून लुटलेला मोबाईल आणि घरफोडीतील मुद्देमालासह सुमारे दीड लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. राहुल मारुती इंगळे (वय ३२, रा. हनुमान मंदिरासमोर, राज्य कर्मचारी सोसायटी, अशोकनगर) आणि रोहन छबुलाल वाघ (वय २०, रा. श्रमिकनगर, सातपूर) अशी अटक करण्यात आलेल्या अट्टल संशयितांची नावे आहेत.

अशी झाली कारवाई...

सातपूर परिसरातील चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शोध पथक गस्तीवर होते. यादरम्यान पथकाचे हवालदार तुषार देसले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून अट्टल चोरट्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली.

पहिली कारवाई (घरफोडीचा छडा): माहिती मिळताच पोलिसांनी अशोकनगर भागात सापळा रचून संशयित राहुल इंगळे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मोठ्या घरफोड्या केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या गुन्ह्यातील दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या हवाली केला.

दुसरी कारवाई (जबरी चोरीचा छडा): दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी श्रमिकनगर परिसरातून रोहन वाघ या संशयिताला बेड्या ठोकल्या. रोहनने सातपूर परिसरात एका नागरिकाला अडवून जबरी लूट केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून लुटलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

दीड लाखांचा ऐवज जप्त

पोलिसांनी दोन्ही संशयितांकडून गुन्ह्यात चोरलेला आणि लुटलेला एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन सराईतांच्या अटकेमुळे सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही यशस्वी कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली:

हवालदार तुषार देसले, दीपक खरपडे, सचिन सुपले

पोलीस अंमलदार सचिन आजबे, सोनू खाडे, अमोल मोरे आणि योगेश्वर गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.