नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १९ जून - हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये अन्न कापण्यासाठी किंवा प्रक्रियेसाठी गंजलेल्या, तडे गेलेल्या अथवा रंग लावलेल्या सुऱ्या आणि ब्लेडचा वापर करणाऱ्यांवर आता सरकारची कडक नजर असणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) या संदर्भात देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. अन्न हाताळणी, प्रक्रिया आणि पॅकिंग करताना केवळ ‘फूड-ग्रेड‘ (अन्न-दर्जा), विषमुक्त आणि गंजरोधक सुऱ्या, ब्लेड तसेच इतर कापण्याची उपकरणे वापरणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही!
'एफएसएसएआय'ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, काही अन्न व्यवसायांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाच्या, गंजलेल्या आणि खराब झालेल्या साधनांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. अशा घातक उपकरणांमुळे अन्नामध्ये भौतिक, रासायनिक आणि सूक्ष्मजीवजन्य दूषितीकरण (Contamination) होण्याची दाट शक्यता असते. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती प्राधिकरणाने व्यक्त केली आहे.
काय आहेत नवीन मार्गदर्शक सूचना?
केवळ 'फूड-ग्रेड' उपकरणांचा वापर: अन्न तयार करणे, प्रक्रिया, पॅकिंग आणि साठवणुकीसाठी वापरली जाणारी सर्व उपकरणे, तसेच अन्नाचा थेट संपर्क येणारे पृष्ठभाग 'फूड-ग्रेड' आणि गंजरोधक असणे अनिवार्य आहे.
नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण: वापरल्या जाणाऱ्या सर्व साधनांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण (Sanitization) आणि योग्य देखभाल करावी लागेल.
दोषी उपकरणे तात्काळ बदला: गंज लागलेल्या, तडे गेलेल्या, रंग उडालेल्या किंवा इतर दोष असलेल्या सुऱ्या व ब्लेड तात्काळ बदलून त्या जागी दर्जेदार उपकरणे वापरण्याच्या सूचना अन्न व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत.
नियम मोडल्यास थेट कायदेशीर कारवाई!
कठोर कारवाईचा इशारा:
या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध ‘अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६’ तसेच संबंधित नियमांनुसार थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे.
या मोहिमेसाठी सर्व राज्यांचे अन्न सुरक्षा आयुक्त, परवाना प्राधिकरणे आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना (FSO) आपापल्या भागात विशेष दक्षता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेल आणि अन्न निर्मितीच्या ठिकाणी अचानक तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचे निर्देश 'एफएसएसएआय'ने दिले आहेत.