मुंबई, (प्रतिनिधी) १९ जून - भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि गुंतवणूकदार ज्याची चातकासारखी वाट पाहत होते, त्या 'जिओ प्लॅटफॉर्म्स' (Jio Platforms) च्या सार्वजनिक समभाग विक्रीची (IPO) औपचारिक प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने स्टॉक एक्स्चेंजना दिलेल्या माहितीनुसार, जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने २७ कोटी इक्विटी समभागांपर्यंतच्या (Equity Shares) फ्रेश इश्यूला मंजुरी दिली आहे. रिलायन्सच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश डी. अंबानी यांनी स्वतः ही मोठी घोषणा केली.
भागधारकांसाठी भावनिक क्षण अन् मूल्यनिर्मितीची संधी
वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना मुकेश अंबानी भावूक झाले होते. "हा क्षण रिलायन्स परिवार आणि त्याच्या लाखो भागधारकांसाठी भावनिक आहे. रिलायन्स आणि तिच्या भागधारकांमधील नाते हे विश्वास, परस्पर आदर आणि सामायिक प्रगतीवर आधारित असलेले एक दृढ व पवित्र बंधन आहे," अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. हा प्रस्तावित आयपीओ नजीकच्या भविष्यात रिलायन्सच्या विद्यमान भागधारकांसाठी मोठ्या प्रमाणात मूल्यनिर्मिती (Value Unlock) करेल, तसेच नव्या गुंतवणूकदारांसाठी ही एक सुवर्णसंधी असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'जिओ आयपीओ'ची ठळक वैशिष्ट्ये:
फ्रेश इश्यू: कंपनी २७ कोटींपर्यंत नवीन समभाग (Fresh Issue) बाजारात आणणार आहे.
दर्शनी मूल्य (Face Value): या समभागांचे दर्शनी मूल्य प्रति समभाग १० रुपये असेल.
किंमत निश्चिती: आयपीओच्या शेअरची किंमत 'बुक बिल्डिंग' (Book Building) प्रक्रियेद्वारे निश्चित केली जाईल.
नियामक मंजुरी: ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) आजच 'सेबी' (SEBI) तसेच बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) कडे दाखल करण्यात येत असून, तो नियामक मंजुरीच्या अधीन असेल.
५२.४ कोटी ग्राहकांसह जिओचा जागतिक डंका!
गेल्या दहा वर्षांत जिओने भारताच्या डिजिटल परिवर्तनात निर्णायक भूमिका बजावली आहे. कधीकाळी डेटा आणि इंटरनेट खर्चिक असताना जिओने व्हॉईस कॉल मोफत केले आणि डेटा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा बनवला.
जिओची आजची ताकद:
एकूण ग्राहक: ५२.४ कोटींच्या पार.
५G ग्राहक: २६.८ कोटींहून अधिक (चीनबाहेर एकाच देशातील हा सर्वात मोठा ५G ग्राहकवर्ग आहे).
जिओएअरफायबर: १.३ कोटी कनेक्टेड घरांचा टप्पा पार करत जिओ जगातील सर्वात मोठा फिक्स्ड वायरलेस ब्रॉडबँड ऑपरेटर बनला आहे.
'जिओ'च्या भविष्यातील ५ प्रमुख योजना (Commitments):
मुकेश अंबानी यांनी जिओच्या पुढील वाढीचा प्रवास पाच प्रमुख स्तंभांवर आधारित असेल असे सांगितले:
१. जिओ ट्रू ५G: भारताच्या पुढील डिजिटल क्रांतीचा पाया भक्कम करणे.
२. जिओएअरफायबर: देशाच्या कानाकोपऱ्यात हाय-स्पीड होम ब्रॉडबँड पोहोचवणे.
३. उद्योग सक्षमीकरण: भारतीय उद्योग व लघुउद्योजकांचे डिजिटल सक्षमीकरण करणे.
४. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI): एआय तंत्रज्ञान प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि प्रत्येक क्षेत्रापर्यंत पोहोचवणे.
५. जागतिक भरारी: भारतात पूर्णपणे विकसित झालेले तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे.
"जिओची प्रस्तावित लिस्टिंग जगाला दाखवून देईल की भारत जागतिक दर्जा, जागतिक क्षमता आणि जागतिक मूल्य असलेल्या तंत्रज्ञान कंपन्या उभारू शकतो. जिओचे भविष्य आणखी उज्ज्वल आहे."
— मुकेश डी. अंबानी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, रिलायन्स इंडस्ट्रीज.