भिवंडी, (प्रतिनिधी) १९ जून - परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise) एक मोठी आणि यशस्वी मोहीम राबवली आहे. भिवंडी येथील मुंबई-नाशिक हायवेवरील वडपे गावच्या कमानीसमोर रचलेल्या सापळ्यात तब्बल १ कोटी ९० लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये केवळ गोवा राज्यातच विक्रीसाठी अधिकृत असलेल्या विदेशी मद्याच्या ७७ हजार ७६० सीलबंद बाटल्या आणि एका ६ चाकी कंटेनर ट्रकचा समावेश आहे. गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या विदेशी मद्याची मोठी खेप मुंबईच्या दिशेने वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भिवंडी विभाग ठाणे-२ च्या पथकाने वडपे गावाजवळ अत्यंत गुप्तपणे पाळत ठेवली.
अशी झाली कारवाई आणि जप्त केलेला मुद्देमाल:
हायवेवरून जाणारा एक संशयित अशोक लेलँड ६ चाकी कंटेनर (क्रमांक HR-61 F-1508) पथकाने अडवला. वाहनाची कसून झडती घेतली असता, पोलिसांनाही धक्का बसला. कंटेनरमध्ये वेगवेगळ्या नामांकित ब्रँड्सच्या विदेशी मद्याचे तब्बल १,६२० बॉक्स (७७,७६० सीलबंद बाटल्या) लपवून ठेवण्यात आले होते.
जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील :
विदेशी मद्य (७७,७६० बाटल्या) : किंमत ₹ १ कोटी ६३ लाख २९ हजार ६००
अशोक लेलँड ६ चाकी कंटेनर : किंमत ₹ २७ लाख
मोबाईल फोन : किंमत ₹ ६ हजार
एकूण जप्त मुद्देमाल : ₹ १ कोटी ९० लाख ३५ हजार ६००
चालकाला अटक: याप्रकरणी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या हनुमान मोबता राम (वय २८ वर्षे, रा. बाडमेर, राजस्थान) या चालकाला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
ही मोठी कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, ठाणे-२ चे अधीक्षक उत्तम शिंदे आणि उपअधीक्षक अभिजित देशमुख यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाई करणाऱ्या पथकात भिवंडी विभागाचे निरीक्षक सुभाष एस. खंडेराय, दिपक परब, दुय्यम निरीक्षक संजय वाकचौरे, आप्पा चव्हाण, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अर्जुन कापडे आणि जवान नारायण जानकर, गणेश पाटील, सचिन पवार, निलेश तायडे व स्वरुपा भोसले यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक सुभाष खंडेराय करत आहेत.
नागरिकांना जाहीर आवाहन: माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त राहणार!
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या परिसरात कुठेही अवैध किंवा बेकायदेशीर मद्याची निर्मिती, विक्री अथवा वाहतूक होत असल्याचे आढळल्यास तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
टोल फ्री क्रमांक: १८००२३३९९९९
लँडलाईन क्रमांक: ०२२-२०८२२४८८
(माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.)