सिडकोतील कुख्यात गुंडाला नाशिक पोलीस आयुक्तांचा हिसका... अंबडमधील १२ दाखल गुन्ह्यांची दखल...

Share:
Main Image
Last updated: 19-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ जून - सिडको आणि शिवाजी चौक परिसरात आपल्या गुंडगिरीने दहशत माजविणाऱ्या कुख्यात गुंडाच्या मुसक्या आवळण्यात नाशिक शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. इंदिरानगर वसाहतीतील अंबादास बाळू दांडेकर (वय २३, रा. लेखानगर, सिडको) याच्या विरुद्ध पोलिसांनी अखेर एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्धतेची कडक कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ २ चे उपायुक्त किशोर काळे यांनी या कारवाईच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. अंबड पोलिसांनी या कुख्यात गुंडाविरुद्ध ठोस पुरावे गोळा करून हा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार मंगळवारी (१६ जून) त्याची रवानगी कारागृहात (स्थानबद्ध) करण्यात आली.

शस्त्रांचा धाक आणि तोडफोड; पाहा गुन्ह्यांची यादी:

अंबादस दांडेकर हा पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात एकट्या अंबड पोलीस ठाण्यात बाराहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारीच्या पद्धतीमुळे संपूर्ण सिडको परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्याच्यावर खालील गुन्हे दाखल आहेत:

दहशत आणि मारहाण: शिवाजी चौक भागात शस्त्राचा धाक दाखवून हाणामारी करणे, लोकांना गंभीर दुखापत करणे आणि दुकानांची तोडफोड करणे.

Advertisement

चोरी आणि धमक्या: वाहन चोरी, उद्यानातील साहित्याची चोरी तसेच बांधकाम साहित्याची चोरी करणे. चोरी करताना कोणी हटकल्यास किंवा टोकल्यास त्याला अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देणे व बेदम मारणे.

वाहनांचे नुकसान: हातात कोयता घेऊन रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करणे आणि घरफोडी करणे.

तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन पडले महाग!

अंबादासच्या गुन्हेगारी कृत्यांवर लगाम लावण्यासाठी पोलिसांनी यापूर्वी त्याला शहरातून हद्दपार (तडीपार) केले होते. मात्र, कायद्याचा कोणताही आदर न राखता त्याने तडीपारीच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले आणि तो पुन्हा शहरात येऊन गुन्हे करू लागला.

त्याची ही वाढती गुंडगिरी लक्षात घेऊन अंबड पोलीस प्रशासनाने त्याच्याविरुद्ध 'एमपीडीए'चा (झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा) कडक प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाच्या सखोल चौकशीअंती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावर शिक्कामोर्तब करून त्याला स्थानबद्ध केले. या धडक कारवाईमुळे सिडको आणि परिसरातील व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.