संचालकांच्या नातेवाईकांना कर्जवाटप केले... रिझर्व्ह बँकेचा नाशिकच्या या बँकेला मोठा दणका...

Share:
Main Image
Last updated: 19-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ जून - नाशिकमधील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या 'द नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लिमिटेड' (The Nasik Road Deolali Vyapari Sahakari Bank Ltd.) वर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेला २ लाख १० हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने १२ जून २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत आदेशाद्वारे ही कारवाई केली असून, यामुळे नाशिकच्या सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

...म्हणून झाली कारवाई!

रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च २०२५ या दिवशीच्या आर्थिक स्थितीच्या आधारे बँकेचे वैधानिक निरीक्षण (Statutory Inspection) केले होते. या तपासणीत बँकेने 'संचालक, त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्या/संस्थांना कर्ज आणि अग्रिम रक्कम देणे' या संदर्भातील आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. या निरीक्षणाच्या आधारे बँकेने आपल्याच संचालकांच्या नातेवाईकांना कर्ज मंजूर केल्याचा गंभीर ठपका आरबीआयने ठेवला आहे.

Advertisement

कारणे दाखवा नोटीस आणि सुनावणीनंतर अंतिम निर्णय

या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने प्रथम देवळाली व्यापारी बँकेला 'कारणे दाखवा नोटीस' बजावली होती. या नोटीसला बँकेने दिलेले उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीदरम्यान (Personal Hearing) बँकेच्या प्रतिनिधींनी मांडलेली बाजू विचारात घेतल्यानंतरही बँकेवरील हा आरोप सिद्ध झाला. त्यानंतर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ च्या कलम ४७अ(१)(क), कलम ४६(४)(आय) आणि कलम ५६ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून आरबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक ब्रिज राज यांनी हा दंड ठोठावला.

ग्राहकांच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम नाही:

रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई केवळ नियामक अनुपालनातील (Regulatory Compliance) त्रुटींवर आधारित आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर या कारवाईमुळे कोणताही परिणाम होणार नाही. तसेच, या दंडाव्यतिरिक्त आरबीआयकडून बँकेवर इतर कोणतीही स्वतंत्र कारवाई केली जाऊ शकते, असेही आदेशात नमूद आहे.

Advertisement

Comments

No comments yet.