नाशिकची कन्या देशाचे नेतृत्व करणार... भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी भाविका अहिरेची नियुक्ती...

Share:
Main Image
Last updated: 18-Jun-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १८ जून - नाशिक जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. मूळची नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर येथील असलेली आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची धडाकेबाज खेळाडू भाविका अहिरे हिची श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (NDCA) चेअरमन विनोद शहा आणि सेक्रेटरी समीर रकटे यांनी प्रचंड आनंद व्यक्त करत भाविकाला आगामी दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लखमापूर ते टीम इंडियाची कॅप्टन: भाविकाचा प्रेरणादायी प्रवास

भाविकाचे आई-वडील पूनम व मनोजकुमार अहिरे २०१३ पर्यंत नाशिक येथे नोकरीला होते. त्यानंतर कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले. भाविका अवघ्या १० वर्षांची असताना तिच्यातील टॅलेंट ओळखून पालकांनी तिला कासारवाडीच्या क्रिकेट अकादमीत दाखल केले. २०१७ पासून तिला अनुभवी प्रशिक्षक संजय हाडके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अकादमीत मुलांसोबत खडतर सराव करत तिने फलंदाजी आणि यष्टिरक्षण (Wicket-keeping) या दोन्ही आघाड्यांवर आपली चमक दाखवली.

धावांचा पाऊस आणि 'बीसीसीआय'चा बहुमान

भाविकाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने राष्ट्रीय स्तरावर स्वतःचा ठसा उमटवला आहे:

१५ वर्षांखालील संघ: मुंबईविरुद्ध १२९ आणि वडोदराविरुद्ध ११३ धावांची तुफानी खेळी करून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा पुरस्कार पटकावला.

१९ वर्षांखालील संघ: पदार्पणाच्याच सामन्यात मेघालयविरुद्ध ११९ धावा फटकावून संघात स्थान पक्के केले.

आशिया कप व विश्वचषक: तिच्या सातत्यामुळे तिला २०२४ च्या आशिया कप विजेत्या संघात स्थान मिळाले. तसेच जानेवारी २०२५ मध्ये आयसीसी (ICC) १९ वर्षांखालील टी-ट्वेन्टी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात तिने मोलाची भूमिका बजावली.

Advertisement

विशेष गौरव: विश्वचषक विजयानंतर तिला बीसीसीआयचा प्रतिष्ठित 'नमन पुरस्कार' मिळाला. जानेवारी २०२६ मध्ये मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या हस्ते तिचा विशेष गौरव करण्यात आला होता.

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनशी (NDCA) जुने नाते

भाविकाच्या या यशाने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ मध्ये एनडीसीएच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 'इंडियन ऑईल मुलांची आंतरशालेय चषक स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. केएसीएफ (KACF) चे चेअरमन प्रशांत सातव यांच्या विनंतीवरून भाविकाला या मुलांच्या स्पर्धेत खेळण्याची विशेष संधी देण्यात आली होती.

या स्पर्धेत बारामती संघाचे प्रतिनिधित्व करताना भाविकाने मुलांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत ३ अर्धशतकांसह २३७ धावा कुटल्या होत्या (सर्वोच्च ८८ धावा). तिच्या या अफाट कौशल्याची दखल घेऊन एनडीसीएने नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक जी. एस. पी. सिंग यांच्या हस्ते हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर (गोल्फ क्लब) तिचा विशेष पारितोषिक देऊन सन्मान केला होता.

२२ जूनपासून श्रीलंका दौऱ्याचा थरार

१९ वर्षांखालील भारतीय महिला संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना होत आहे. या संघात महाराष्ट्राच्या तीन कन्या आपली चुणूक दाखवणार आहेत. भाविका अहिरेसोबत महाराष्ट्राची ईश्वरी अवसरे आणि जान्हवी विरकर यांचीही भारतीय संघात निवड झाली आहे.

दौऱ्याचे वेळापत्रक:

हा दौरा २२ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत होणार असून, यामध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ टी-ट्वेन्टी आणि ३ एकदिवसीय (ODI) सामने खेळवले जाणार आहेत. नाशिककरांसह संपूर्ण देशाचे लक्ष आता कर्णधार भाविकाच्या कामगिरीकडे लागले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.