येवला, (प्रतिनिधी) १८ जून - सावकारी परवान्याचे नूतनीकरण (Renewal) करून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना येवला येथील साहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. सुधीर गोविंद वाघ (वय ४९, वर्ग-३) असे लाच स्वीकारणाऱ्या आरोपी लोकसेवकाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही धडक कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आज, गुरुवार दि. १८ जून २०२६ रोजी येवला येथील प्रशासकीय कार्यालयात केली.
नेमके प्रकरण काय?
या प्रकरणातील मूळ तक्रारदार यांच्या सावकारी परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी आरोपी सुधीर वाघ याने यापूर्वीच ६०,००० रुपये स्वीकारले होते. मात्र, तरीही त्याने नूतनीकरणाचे काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे पुन्हा ७,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५,००० रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात १६ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे रीतसर तक्रार नोंदवली होती.
कार्यालय आवारातच रचला सापळा
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आज १८ जून रोजी एसीबीच्या पथकाने येवला येथील साहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सापळा रचला. तक्रारदार आणि पंचांसमोर आरोपी सुधीर वाघ याने ५,००० रुपयांची लाच (५०० रुपयांच्या १० चलनी नोटा) स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले आणि लाचेची रक्कम हस्तगत केली.
एसीबीचे कारवाई पथक आणि मार्गदर्शन:
ही यशस्वी कारवाई ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीमती स्वाती पवार, पोलीस हवादार शरद हेंबाडे, युवराज खांडवी आणि पोलीस शिपाई समीर शेख यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक श्रीमती एकनाथ पाटील करत आहेत.
एसीबीचे आवाहन: कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ उपलब्ध आहे.