विधान परिषद निवडणूक... उत्तर महाराष्ट्रामध्ये घसघशीत मतदान... नाशिक व जळगावात एवढा आहे टक्का...

Share:
Main Image
Last updated: 18-Jun-2026

नाशिक/जळगाव, (प्रतिनिधी) १८ जून - उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक आणि जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी आज अत्यंत शांततापूर्ण आणि सुरळीत वातावरणात मतदान पार पडले. दोन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी मतदानासाठी प्रचंड उत्साह दाखवला. नाशिक जिल्ह्यात तब्बल ९९.८४ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात ९७.७८ टक्के इतक्या विक्रमी प्राथमिक मतदानाची नोंद झाली असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली.

नाशिक जिल्हा: फक्त एक मतद‍ार गैरहजर; ९ पैकी ८ केंद्रांवर १००% मतदान

नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांवर प्रक्रिया पार पडली. मतदान संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी आकडेवारी जाहीर केली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे उपस्थित होते.

एकूण मतदान: जिल्ह्यात एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

केंद्रांची आकडेवारी: नाशिक (१४६), दिंडोरी (३७), इगतपुरी (४७), निफाड (११०), येवला (८८), चांदवड (४१), कळवण (३८) आणि बागलाण (२८) या आठही केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले.

मालेगावचा टक्का: मालेगाव केंद्रावर ८४ पैकी ८३ मतदारांनी मतदान केल्याने तेथे ९८.८१ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील केवळ हाच एक मतदार गैरहजर राहिला.

कडक बंदोबस्त आणि पाहणी:

Advertisement

निवडणूक निरीक्षक मिलिंद शंभरकर यांनी नाशिक तहसीलसह विविध केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, तर ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक डॉ. जय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जळगाव जिल्हा: पुरुष व महिला मतदारांचा समसमान उत्साह

जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडले.

एकूण मतदान: पात्र असलेल्या एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ मतदारांनी (९७.७८ टक्के) मतदानाचा हक्क बजावला.

स्त्री-पुरुष आकडेवारी: निवडणुकीत ३१५ पुरुष मतदारांपैकी ३०९ पुरुषांनी (९८.१० टक्के), तर ३१५ महिला मतदारांपैकी ३०७ महिलांनी (९७.४६ टक्के) मतदान केले.

केंद्रांची आकडेवारी: अमळनेर, फैजपूर, जळगाव, एरंडोल आणि पाचोरा या पाच मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले. भुसावळ येथे ९८.३१ टक्के, तर चाळीसगाव केंद्रावर सर्वात कमी म्हणजे ७०.७३ टक्के मतदान नोंदवले गेले.

जिल्हा प्रशासनामार्फत सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ, चोख सुरक्षा आणि मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

Advertisement

Comments

No comments yet.