नाशिक, (प्रतिनिधी) १८ जून - कडक उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना ऊसाचा रस पिऊन तृप्त होण्याचा प्रयत्न एका अट्टल चोरट्याच्या चांगलाच अंगलट आला आहे. गस्तीवर असलेले पोलीस वाहन पाहताच रसवंतीगृहातून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या या चोरट्यावर नाशिकरोड पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने झडप घालून बेड्या ठोकल्या. या अटकेमुळे नाशिकरोड आणि अहिल्यानगर (अहमदनगर) परिसरातील मोटारसायकल चोरीच्या पाच गुन्ह्यांचा उलगडा झाला असून संशयिताकडून १ लाख ८३ हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ललित सागर देवरे (वय ३३, रा. उद्योगभवन, सिप्रा बिल्डिंग समोर, सिन्नर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चोराचे नाव आहे.
पोलीस गाडी पाहताच पायाखालची वाळू सरकली!
सिन्नर भागात राहणारा संशयित ललित देवरे हा सोमवारी (१५ जून) दुपारी रणरणत्या उन्हात आणि उकाड्याने त्रस्त होऊन सिन्नर फाटा येथील 'महाराष्ट्र रसवंती गृह' येथे ऊसाचा रस पिण्यासाठी गेला होता. तो रसाचा आस्वाद घेत असतानाच, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक (DB Mobile) गस्त घालत रसवंतीगृहासमोर येऊन धडकले.
अचानक समोर पोलीस वाहन पाहताच ललितच्या पायाखालची वाळू सरकली. साध्या वेशातील गस्ती पथकातील कर्मचारी वाहनातून उतरून थेट रसवंतीगृहाच्या दिशेने येऊ लागल्याने घाबरलेल्या ललितने हातातील रसाचा ग्लास तसाच टेबलावर ठेवला आणि तिथून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांची 'धडक' झडप
काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आल्याने पोलीस पथकाने तात्काळ त्याचा पळण्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि रसवंतीगृहातच त्याच्या मुसक्या आवळल्या. वास्तविक पाहता पोलिसांकडे या चोरट्याबाबत कोणताही थेट सुगावा नव्हता, मात्र त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे तो स्वतःहूनच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
तपासात अट्टल गुन्हेगार असल्याचे उघड
पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, तो अट्टल वाहनचोर असल्याचे समोर आले. त्याने नाशिकरोड आणि अहिल्यानगर परिसरातून पाच मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याने वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या या पाचही दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच, पोलीस रेकॉर्डनुसार त्याच्यावर कल्याण (ठाणे) येथेही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व अतुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे आणि अर्जुन गिते यांच्या पथकाने केली.