नाशिक, (प्रतिनिधी) १७ जून - जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा सर्वसामान्यांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पूर्णपणे मोफत पुरवणाऱ्या 'एसएमबीटी' (SMBT) हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. 'एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट'च्या तज्ज्ञ कार्डियाक सर्जनच्या टीमने अत्यंत क्लिष्ट मानल्या जाणाऱ्या '१०० दिवसांत १०० मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्डियाक शस्त्रक्रिया' (ज्याला सर्वसामान्यांच्या भाषेत ‘की-होल सर्जरी’ म्हटले जाते) यशस्वीपणे पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. इतर खाजगी रुग्णालयांमध्ये ३ ते ५ लाख रुपये खर्च येणारे हे उपचार शासकीय योजनांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत झाल्यामुळे शेकडो रुग्णांना वेदनामुक्त नवजीवन मिळाले आहे.
काय आहे 'MICS' (की-होल) तंत्रज्ञान?
सामान्यतः हृदयविकार किंवा बायपास शस्त्रक्रिया करायची असल्यास रुग्णाच्या छातीचा मधला भाग (बरगड्या) पूर्णपणे कापावा लागतो, अशी भीती रुग्णांमध्ये असते. मात्र, एसएमबीटी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्समध्ये उपलब्ध असलेल्या 'MICS' तंत्रज्ञानामुळे आता केवळ काही मिलिमीटर ते सेंटीमीटर आकाराचे लहान छिद्र घेऊन अत्यंत सुलभतेने या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. यामध्ये:
छातीचे हाड न कापता डाव्या बाजूला छोटा कट देऊन केलेली बायपास सर्जरी.
हृदयाचे निकामी झालेले झडप बदलणे किंवा दुरुस्त करणे (हार्ट व्हॉल्व्ह रिपेअर व रिप्लेसमेंट).
लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या हृदयातील जन्मजात छिद्र लहान चिरा देऊन बंद करणे.
हृदयातील गाठी काढणे (कार्डियाक ट्यूमर रिमूव्हल- Myxoma).
३० हजारांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल ३० हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया आणि प्रक्रिया (प्रोसिजर्स) झाल्या आहेत. नवजात बालकांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. एसएमबीटी हॉस्पिटल 'ना नफा ना तोटा' या तत्वाने कार्य करत असल्याने शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून अत्याधुनिक शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, बायपास आणि बालहृदयरोग शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत.
'समृद्धी'मुळे विदर्भ-मराठवाड्याच्या रुग्णांचा ओघ वाढला; मोफत 'आरोग्यरथ' सेवा!
एसएमबीटी हॉस्पिटलपासून अगदी जवळच समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज (Interchange) असल्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील (नागपूर, अमरावती, बुलढाणा, जालना) रुग्णांना हे हॉस्पिटल अत्यंत सोयीचे झाले आहे. यासोबतच मध्यप्रदेश, ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी या भागातील रुग्णांचा ओघ वाढला आहे. रुग्णांच्या सोयीसाठी नाशिक आणि कसाऱ्याहून 'आरोग्यरथ' ही मोफत बससेवा दररोज चालवली जाते, तर कल्याण-भिवंडीहून एसटी महामंडळ आणि मोफत बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
२४ तास सेवा आणि अद्ययावत पायाभूत सुविधा
हार्ट इन्स्टिट्यूटचे विभागप्रमुख डॉ. गौरव वर्मा आणि हृदयविकार शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची आणि पॅरामेडिकल स्टाफची टीम २४ तास रुग्णसेवेसाठी सज्ज आहे. या डॉक्टरांना २४ वर्षांहून अधिक प्रदीर्घ अनुभव आहे. एसएमबीटीमध्ये १२-शे खाटांचा (Beds) आंतररुग्ण विभाग, २०० आयसीयू बेड आणि अत्याधुनिक कॅथलॅब उपलब्ध आहेत. ४०० पेक्षा अधिक तज्ज्ञ डॉक्टर्स आणि २६ पेक्षा अधिक वेगवेगळ्या स्पेशालिटी सेवा एकाच छताखाली कार्यरत आहेत.
‘की-होल’ शस्त्रक्रियेचे प्रमुख फायदे:
कमी धोका: इन्फेक्शनची (संसर्गाची) शक्यता अत्यंत कमी.
कमी वेदना: शस्त्रक्रियेदरम्यान कमीत कमी रक्तस्राव आणि वेदना होते.
डाग विरहित: छातीवर कायमचे मोठे आणि विद्रूप व्रण (Scar) राहत नाहीत.
फास्ट रिकव्हरी: रुग्ण जलद गतीने बरा होऊन अवघ्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी स्वतःच्या पायावर उभा राहून सुखरूप घरी जाऊ शकतो.
मान्यवरांचे काय म्हणणे आहे?
"भीतीपोटी उपचार लांबवणाऱ्यांसाठी वरदान"
"अनेक रुग्ण बायपासचा सल्ला दिल्यानंतर 'ओपन हार्ट' सर्जरीच्या भीतीने उपचार लांबणीवर टाकतात आणि जीव धोक्यात घालतात. अशा रुग्णांसाठी 'की-होल' सर्जरी हे वरदान ठरत आहे. यात आम्ही छातीचे हाड कापण्याऐवी बरगड्यांच्या मधून एक लहान छिद्र करून बायपास किंवा व्हॉल्व्हची शस्त्रक्रिया करतो. यामुळे रुग्णाला हाडाची दुखापत होत नाही आणि रुग्ण ३ ते ४ दिवसांत घरी जाऊ शकतो."
— डॉ. विद्युतकुमार सिन्हा (हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल)
"गरीब रुग्ण हाच आमचा 'व्हीआयपी'!"
"१०० दिवसांत १०० यशस्वी मिनिमली इन्व्हेजिव्ह शस्त्रक्रिया पूर्ण करणे हा आमच्या संपूर्ण टीमच्या सांघिक प्रयत्नांचा विजय आहे. 'युज हार्ट फॉर एव्हरी हार्ट' या थीमनुसार सर्वसामान्यांना जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा मोफत देणे हाच आमचा ध्यास आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये येणारा सर्वात गरीब रुग्ण हा येथील 'व्हीआयपी' रुग्ण आहे, त्यासही अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळण्याचा पूर्ण हक्क आहे."
— सचिन बोरसे (संचालक, आरोग्यसेवा, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट)