हृदयद्रावक घटना... पोलीस कोठडीतील मुलाला जेवणाचा डबा देण्यासाठी आले... पित्याचा पोलीस ठाण्यातच मृत्यू...

Share:
Last updated: 17-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ जून - पोलीस कोठडीत असलेल्या आपल्या मुलाला दुपारच्या जेवणाचा डबा देण्यासाठी गेलेल्या एका वृद्ध पित्याचा पोलीस ठाण्यातच चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील उपनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी (१६ जून) ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शिरीष भिमाशंकर पाटील (वय ६२, रा. सद्गुरूनगर, सिडको, नाशिक) असे मृत वृद्ध पित्याचे नाव आहे. या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, उपनगर पोलीस ठाण्यात या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलाला अटक झाल्याने रोज पुरवायचे जेवणाचा डबा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष पाटील यांच्या मुलाला पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली असून, तो सध्या उपनगर पोलिसांच्या कोठडीत आहे. न्यायालयीन नियमांनुसार गेल्या काही दिवसांपासून त्याला घरूनच जेवणाचा डबा पुरविला जात होता. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शिरीष पाटील हे नेहमीप्रमाणे आपल्या मुलाची विचारपूस करण्यासाठी आणि त्याला घरचा डबा देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते.

Advertisement

डबा देऊन बाकड्यावर बसले आणि...

पोलीस ठाण्यातील आवारात मुलाला डबा दिल्यानंतर पाटील हे तेथील एका बाकड्यावर (बेंच) विश्रांतीसाठी बसले होते. मात्र, त्याच वेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते थेट जमिनीवर कोसळले. वृद्ध पाटील अचानक खाली पडल्याने पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली.

पोलिसांची तात्काळ धावपळ, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणतीही वेळ न घालवता बेशुद्ध पडलेल्या पाटील यांना तातडीने जवळच्या सुजाता बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या पत्नी सरला पाटील यांनीही रुग्णालयात धाव घेतली. पुढील आणि अधिक उपचारासाठी कुटुंबियांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेतच तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलविले. मात्र, दुर्दैवाने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांना 'मृत' घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.