नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ४ दुचाकीस्वारांचा मृत्यू... तीन जण गंभीर जखमी...

Share:
Main Image
Last updated: 16-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १६ जून - नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अपघातांचे सत्र सुरूच असून, वेगवेगळ्या भागात झालेल्या चार भीषण अपघातांमध्ये चार तरुण दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातांमध्ये इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अत्यंत चिंतेची बाब म्हणजे, अपघात झालेले सर्व चालक विनाहेल्मेट प्रवास करत होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी लासलगाव, मनमाड आणि मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१. अज्ञात वाहनाच्या धडकेत निफाडच्या तरुणाचा मृत्यू

पहिला अपघात निमगाव वाकडा ते लासलगाव मार्गावर झाला. कृष्णा विक्रम मोरे (वय २१, रा. वेळापूर, ता. निफाड) हा तरुण ३ फेब्रुवारीच्या रात्री आपल्या दुचाकीवरून (MH 15 BK 8347) जात असताना, रेणुका नगर भागातील भंगार दुकानासमोर एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला जोरात धडक दिली. या अपघातात कृष्णा गंभीर जखमी झाला होता. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचे वडील विक्रम राजाराम मोरे यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिसांत नोंद करण्यात आली असून, हवालदार धुमाळ तपास करत आहेत.

२. दुचाकी घसरून नांदगावचा २४ वर्षीय तरुण दगावला

दुसरा अपघात नांदगाव तालुक्यातील धोटाणे येथे झाला. अतुल चांगदेव काळे (वय २२, रा. धोटाणे खुर्द) हा तरुण २८ मार्चच्या रात्री धोटाणे बुद्रुक येथून खुर्दच्या दिशेने आपल्या पल्सर दुचाकीवरून (MH 41 BS 1797) जात होता. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी घसरली आणि अतुलच्या छातीला व पोटाला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Advertisement

३. कुत्रे आडवे आल्याने अपघात; मनमाड रस्त्यावर एकाचा बळी

तिसरा अपघात मनमाड-नांदगाव मार्गावरील नागापूर शिवारात पाचेपुला भागात झाला. योगेश गजानन सुरासे (वय ३४, रा. नांदगाव) असे मृताचे नाव आहे. २८ मे रोजी सायंकाळी योगेश हा त्याचा मित्र प्रदीप भाऊसाहेब सोनवणे याच्या दुचाकीवर (MH 41 BW 7634) डबलसीट प्रवास करत होता. अचानक दुचाकीसमोर कुत्रे आडवे आल्याने चालक प्रदीपने जोरात ब्रेक दाबला. यामुळे दुचाकी घसरून दोघेही गंभीर जखमी झाले. त्यापैकी योगेश सुरासे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही अपघातांची मनमाड पोलीस ठाण्यात नोंद असून, हवालदार व्यापारे तपास करत आहेत.

४. मालेगावजवळ कंटेनरची धडक; ट्रिपलसीट प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्याचा अंत

चौथा अपघात मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे शिवारात हॉटेल रायगडसमोर शनिवारी (दि. १३) घडला. कल्पेश कैलास चौरे, गिरीधर छोट्या गांगुर्डे आणि चेतन कन्हैयालाल पवार (सर्व रा. नंदुरबार) हे तीन विद्यार्थी मित्र एकाच दुचाकीवर (MH 39 AP 2339) ट्रिपलसीट प्रवास करत मालेगाव-मनमाड रस्त्याने येवल्याच्या दिशेने जात होते.

यावेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने (NL 01 AJ 4382) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात विद्यार्थी चेतन पवार याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोघे मित्र गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलिसांत राजस्थानमधील कंटेनर चालक धनराज रेबारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.