पुण्यातील ३२ फ्लॅट्सची रोकड मित्राच्या बनावट खात्यात केली वर्ग... मॅनेजरला नाशकात असे केले जेरबंद...

Share:
Main Image
Last updated: 16-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १६ जून - पुण्यातील एका नामांकित बांधकाम प्रकल्पातील (Real Estate Project) ३२ ग्राहकांकडून आलेली तब्बल दोन कोटी रुपयांची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता तिचा अपहार करून फरार झालेल्या ठकबाज व्यवस्थापकाला (मॅनेजर) नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नाशिकमधील काळेनगर भागातील एका नामांकित हॉटेलमध्ये लपून बसलेल्या या संशयिताला पोलिसांनी २४ तासांच्या आत जेरबंद केले.

३२ ग्राहकांची रक्कम केली परस्पर वर्ग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायमन रॉनी पीटर (वय ४२, रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित व्यवस्थापकाचे नाव आहे. याप्रकरणी पुणे येथील बांधकाम व्यावसायिक किरण दादासाहेब शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे यांच्या कंपनीची पुणे शहरात 'गंगा फर्नहिल' नावाने मोठी बांधकाम साईट सुरू आहे. या प्रकल्पात ए, बी, सी, डी अशा चार इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या संपूर्ण प्रोजेक्टमधील फ्लॅट विक्री (Sales) आणि ग्राहकांना माहिती देण्याचे मुख्य काम संशयित सायमन पीटर हाच पाहत होता.

व्यवस्थापक पदाचा गैरफायदा घेत सायमनने या साईटमधील अनेक घरांची विक्री केली. मात्र, ३२ ग्राहकांकडून आलेली तब्बल दोन कोटी रुपयांची रक्कम त्याने 'गंगा फर्नहिल' कंपनीच्या अधिकृत बँक खात्यात जमा केली नाही. त्याऐवजी त्याने त्याचा मित्र बी. चंद्रशेखर याच्या नावाने एक बनावट बँक खाते उघडले आणि सर्व रक्कम परस्पर त्या खात्यात वर्ग करून कंपनीची मोठी फसवणूक केली.

Advertisement

नाशिकच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हा कोट्यवधी रुपयांचा अपहार निदर्शनास येताच व्यावसायिक किरण शिंदे यांनी पुणे येथील काळेपडळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संशयित सायमन पीटर पुण्यातून पसार झाला होता.

तो नाशिकमध्ये लपल्याची गोपनीय माहिती काळेपडाळ पोलिसांनी नाशिकच्या गंगापूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच गंगापूर पोलिसांचे पथक तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. काळेनगर येथील 'हॉटेल ट्रिबो सफायर' येथे पोलिसांनी छापा टाकला आणि तिथल्या रूम नंबर ३०१ मधून सायमन पीटरला ताब्यात घेतले.

पुणे पोलिसांच्या स्वाधीन

नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी संशयित सायमन पीटरला अटक केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील तपासासाठी त्याला पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही धडक कारवाई गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, हवालदार रवींद्र मोहिते, गिरीष महाले, भागवत थवील, अंमलदार घनश्याम भोये, प्रवीण केदारे, गोरख साळुंखे, सुजीत जाधव, आणि तुळशीदास चौधरी यांच्या पथकाने केली.

Advertisement

Comments

No comments yet.