नाशिक, (प्रतिनिधी) १६ जून - जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री करणाऱ्या 'ओएलएक्स' (OLX) या संकेतस्थळाचा गैरफायदा घेऊन, 'ट्रायल' घेण्याच्या बहाण्याने दुचाकी पळवणाऱ्या जळगाव येथील एका सराईत भामट्याला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. संशयित आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून विनानंबरची दुचाकी पळवून नाशिक शहरात वापरत होता. त्याच्या ताब्यातून १ लाख २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी त्याला मुद्देमालासह छत्रपती संभाजीनगरच्या वाळूंज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
असा रचला होता फसवणुकीचा सापळा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज जितेंद्र लहासे (वय २७, रा. पूर्णानाल, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित भामट्याचे नाव आहे. धनराजने ओएलएक्स वेबसाईटवर दुचाकी विक्रीची जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीतील मोबाईल नंबरवर संपर्क साधून त्याने गेल्या सोमवारी (दि. ८) छत्रपती संभाजीनगर गाठले. तेथे दुचाकी मालकाची भेट घेऊन, "मला तुमची गाडी खूप आवडली असून ती खरेदी करायची आहे," असे सांगत त्याने मालकाचा विश्वास संपादन केला.
गाडी फायनल करण्यापूर्वी 'एकदा चक्कर मारून ट्रायल बघतो' असे सांगून त्याने दुचाकीचा ताबा मिळवला आणि तिथून थेट धूम ठोकली. बराच वेळ उलटूनही ग्राहक गाडी घेऊन परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे मालकाच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने वाळूंज पोलीस ठाण्यात अपहार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.
नाशिक पोलिसांच्या नाकाबंदीत अडकला भामटा
वाळूंज पोलीस संशयिताचा शोध घेत असतानाच, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने सोमवारी (दि. १५) नाशिक शहरात विनानंबर प्लेट असलेल्या दुचाकींची अचानक विशेष तपासणी (झाडाझडती) सुरू करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट २ चे पथक मुंबई-आग्रा महामार्गावरील अश्विननगर भागातील सर्व्हिस रोडवर वाहनांची तपासणी करत होते.
त्याच वेळी संशयित धनराज लहासे हा छत्रपती संभाजीनगर येथून पळवलेली विनानंबरची दुचाकी घेऊन तिथून जात असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी गाडीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली, ज्यामुळे वाळूंज पोलिसांत दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला.
गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
ही धडक कारवाई गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक डॉ. समाधान हिरे, हवालदार अतुल पाटील, मनोज परदेशी, प्रदीप नन्नवरे, वाल्मिक चव्हाण, अंमलदार प्रवीण वानखेडे आणि जितेंद्र वजीरे आदींच्या पथकाने केली आहे.