सावधान! तुम्ही खात असलेला ब्रेड, पोहे, ज्यूस सुरक्षित आहेत? FSSAIचा या १५ मोठ्या ब्रँड्सला दणका...

Share:
Main Image
Last updated: 18-Jun-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १८ जून - महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारलेला असतानाच, आता राष्ट्रीय पातळीवरही मोठी कारवाई झाली आहे. 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा'ने (FSSAI) ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे, खोटी व्यापारी नावे आणि लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील १५ लोकप्रिय फूड ब्रँड्सना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये आपल्या रोजच्या वापरातील ब्रेड, ज्यूस, पोहे आणि चिप्स उत्पादकांचा समावेश असल्याने ग्राहकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे. FSSAI ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या कारवाईची माहिती दिली. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा (FSS Act), २००६ चे उल्लंघन करणाऱ्या या कंपन्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

FSSAI च्या रडारवर आलेले ब्रँड्स आणि त्यांचे खोटे दावे:

१. 'झिरो मैदा'चा खोटा दावा (द हेल्थ फॅक्टरी):

'द हेल्थ फॅक्टरी झिरो मैदा होल व्हीट ब्रेड' आणि 'झिरो मैदा पिझ्झा बेस' या उत्पादनांवर 'झिरो मैदा'चा दावा करण्यात आला होता. मात्र, तपासणीत यामध्ये चक्की फ्रेश आटा आणि 'व्हीट ग्लूटेन' (गव्हाचे प्रथिन) समाविष्ट असल्याचे आढळले. हा दावा ग्राहकांची फसवणूक करणारा आहे.

२. 'ऑरगॅनिक' (सेंद्रिय) नावाचा गैरवापर:

'ऑरगॅनिक विस्डम', 'शाइन ऑरगॅनिक', 'टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म्स' आणि 'वर्ल्ड ऑफ ऑरगॅनिक' या ब्रँड्सनी आपल्या नावात सेंद्रिय शब्दाचा वापर केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या उत्पादनांकडे NPOP/PGS प्रमाणपत्र, FSSAI चा अधिकृत 'जैविक भारत' लोगो आणि आवश्यक मंजुरी नाही.

३. ज्यूस आणि पाण्याच्या नावाखाली फसवणूक:

स्टोरिया ज्यूस पोमेग्रनेट: या पेयामध्ये केवळ ४% डाळिंबाच्या रसाचा अर्क (concentrate) असतानाही, ते संपूर्ण डाळिंबाचा रस असल्याचा आभास निर्माण करून विकले जात होते.

लोटा वॉटर (फील द डिफरन्स): पॅकेज्ड पिण्याच्या पाण्यात खनिजे (minerals) जोडल्याचा दावा नियमांच्या विपरित आहे. नियमानुसार, प्रक्रियेदरम्यान गमावलेली पोषक तत्वे फक्त भरून काढली असल्यास 'अॅडेड न्यूट्रिएंट्स' असा दावा करता येत नाही.

Advertisement

४. 'व्हेगन' आणि 'हेल्दी' शब्दांचा खोटा आव:

प्लॅन बी प्लांट बेस्ड व्हेगन: शाकाहारी (Vegan) अन्न अनुमोदनाची पूर्वपरवानगी नसतानाही या ब्रँडने ग्राहकांची दिशाभूल केली.

न्यूहर्ब्स ट्रू व्हिटॅमिन: 'ट्रू व्हिटॅमिन' हा शब्द अन्न सुरक्षा नियमांत कुठेही व्याख्यायित किंवा मान्यताप्राप्त नाही.

इतर ब्रँड्स: 'हेल्दी मास्टर', 'ट्रूव्ही द हेल्दी मिक्स व्हेजी चिप्स', 'हेल्दी चॉईस पोहा', 'इमामी हेल्दी अँड टेस्टी' आणि 'हेल्थ एड' या ब्रँड्सनी उत्पादनाच्या स्वरूपाबाबत ग्राहकांमध्ये चुकीचा समज निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

नेस्ले, केएफसीनंतर आता बड्या ब्रँड्सची वारी

काही दिवसांपूर्वीच FSSAI ने नेस्ले, केएफसी (KFC) आणि ओपन सीक्रेट यांसारख्या बलाढ्य ब्रँड्सना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर आता थेट रोजच्या वापरातील १५ ब्रँड्सवर कारवाई झाल्याने खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

प्रशासनाचा ग्राहकांना सतर्कतेचा इशारा

ग्राहकांनी कोणत्याही उत्पादनावरील 'हेल्दी', 'झिरो मैदा' किंवा 'ऑरगॅनिक' यांसारख्या मोठ्या अक्षरातील दाव्यांना न भुलता, पाकिटाच्या मागे असलेले घटक (Ingredients) नीट तपासावेत, असे आवाहन अन्न सुरक्षा तज्ज्ञांनी केले आहे. या कारवाईमुळे अन्न निर्मिती क्षेत्रात पारदर्शकता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.