लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणारी दुकली जेरबंद... पोलिसांची अवघ्या काही तासांत कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 15-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १५ जून - रस्त्याने पायी जाणाऱ्या किंवा वाहनाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन लुटणाऱ्या एका सराईत दुकलीला आडगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका परप्रांतीय तरुणाला मारहाण करून लुटल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांत आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने या दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून लुटलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. गणेश शांताराम नेहरे आणि शुभम अशोक मडावी (दोघे रा. कोणार्क नगर, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित लुटारूंची नावे आहेत. याप्रकरणी संजू कुमार राजाराम कोल (वय ३३, मूळ रा. मध्य प्रदेश, हल्ली रा. लोकमान्य हॉस्पिटलच्या बाजूला, धात्रक फाटा, नाशिक) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

रिक्षाची वाट पाहत असताना जाळ्यात ओढले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजू कोल हा तरुण शुक्रवारी (दि. १२) जत्रा चौफुली भागात गेला होता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तो घरी जाण्यासाठी चौफुलीपासून काही अंतरावर रिक्षाची प्रतीक्षा करत थांबला होता.

त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या संशयित गणेश नेहरे आणि शुभम मडावी यांनी संजू याला लिफ्ट देण्याचा बहाणा केला. त्याला विश्वासत घेऊन त्यांनी दुचाकीवर 'ट्रिपल सीट' बसवले. मात्र, घरी सोडण्याऐवजी संशयितांनी दुचाकी एका निर्जनस्थळी नेली. त्या ठिकाणी त्यांनी संजू याला बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ करत त्याच्या खिशातील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेऊन दोघेही पसार झाले.

Advertisement

पेट्रोलींग पथकाने ठोकल्या बेड्या; ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त

या धक्कादायक प्रकारानंतर संजू कोल याने तातडीने आडगाव पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करत तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गुन्हे शोध पथक लुटारूंचा शोध घेत असतानाच, परिसरात पेट्रोलींग करणाऱ्या पथकाला हे संशयित मिळून आले.

पोलिसांनी संशयावरून दोघांना ताब्यात घेऊन खाकी दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयितांच्या ताब्यातून लुटलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (क्र. MH 15 AC 589) असा एकूण ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

'या' पथकाने केली कामगिरी

ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड व शिवाजी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निखील बोंडे, उपनिरीक्षक विकास पंचमुख, हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेशी, श्रीकांत महाजन तसेच अंमलदार सुमीत शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, अक्षय गोसावी, रविंद्र लिलके, प्रितम बोराटे, दिपक भुजबळ, कुणाल राऊत, योगेश गावित व वैशाली बच्छाव आदींच्या पथकाने केली.

Advertisement

Comments

No comments yet.