नाशिक, (प्रतिनिधी) १४ जून - शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या भाभानगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत किंवा वादातून गोंधळ घालणाऱ्या एका दाम्पत्याने चक्क खाकी वर्दीवरच हात टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना 'तुम्ही पैसे खाल्ले का?' असे म्हणत शिवीगाळ करण्यात आली. तसेच एका पोलीस अंमलदाराचा शासकीय गणवेश पकडून धक्काबुक्की करण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर पोलिसांनी अतिरिक्त बळाचा वापर करत संशयिताला ताब्यात घेतले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाभानगर येथील 'अशोक वनरा रेसिडेन्सी' या इमारतीत काही लोक मारामारी करत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला (डायल ११२) प्राप्त झाली होती.
'डेल्टा मोबाईल' पथक पोहचताच पोलिसांवरच आगपाखड
मध्यरात्रीच्या सुमारास कॉल मिळताच मुंबईनाका पोलिसांचे 'डेल्टा मोबाईल' पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी गौतम शृंगारे नामक व्यक्ती प्रचंड आरडाओरड करत गोंधळ घालत होता आणि आजूबाजूचे लोक त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत गौतमला शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र, यामुळे संतापलेल्या संशयिताने उद्धटपणे पोलिसांवरच आगपाखड केली. "तुम्ही मला पकडण्यासाठी आलात का? तुम्ही पैसे खाल्ले का?" असे गंभीर आरोप करत त्याने पोलिसांना अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
शर्ट काढून जमिनीवर लोळला, सरकारी गाडी फोडण्याचा प्रयत्न
पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, संशयित गौतमने स्वतःच्या अंगावरील शर्ट काढून थेट जमिनीवर लोळण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला उचलून पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने शासकीय वाहनाची काच फोडण्याचाही प्रयत्न केला.
गुन्हेशोध पथकाला पाचारण; पतीची धक्काबुक्की, पत्नीने पोलिसांना मागे ओढले
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून घटनास्थळी अतिरिक्त गुन्हेशोध पथकाला (DB) पाचारण करण्यात आले. पथकातील अधिकाऱ्यांनीही संशयिताला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा राग अनावर झाला होता. त्याने पोलिसांच्या अंगावर धावून जात थेट हात उगारला. संशयिताने एका पोलीस अंमलदाराचा शासकीय गणवेश पकडून त्यांना बेदम धक्काबुक्की केली.
हा राडा सुरू असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) हे संशयित गौतमला पकडण्यासाठी पुढे सरसावले. त्याच वेळी संशयिताच्या पत्नीने मागून येत सहाय्यक उपनिरीक्षकांना पाठीमागून घट्ट धरून मागे ओढले आणि शासकीय कामात अडथळा आणला.
अखेर कायदेशीर बळाचा वापर करत ठोकल्या बेड्या
दाम्पत्याकडून सातत्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला जात असल्याने आणि पोलिसांवरच हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने, पथकाने अखेर आवश्यक त्या कायदेशीर बळाचा वापर केला. पोलिसांनी संशयित गौतम शृंगारे याला जागीच दाबून धरत ताब्यात घेतले. या दाम्पत्याविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये (शासकीय कामात अडथळा व पोलिसांवर हल्ला) गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.