नाशिक, (प्रतिनिधी) १५ जून - एसटी बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांचे दागिने हातोहात लांबवणाऱ्या एका सराईत चोरट्या महिलेला अटक करण्यात मुंबईनाका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी महामार्ग बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करत या महिलेचा माग काढला आणि तिला त्र्यंबक नाका परिसरातून बेड्या ठोकल्या. तिच्या ताब्यातून २ लाख २५ हजार रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे. या महिलेच्या अटकेमुळे बसस्थानक परिसरातील चोरीचे अनेक मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आशा देविदास लोंढे (वय ५५, रा. जयभवानी रोड, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिला चोराचे नाव आहे. याप्रकरणी प्रेरणा प्रमोद शिंदे (रा. ठाणे) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
बसमध्ये चढताना साधली गर्दीची संधी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेरणा शिंदे या काही कामानिमित्त नाशिक शहरात आल्या होत्या. गेल्या सोमवारी (दि. ८) सायंकाळी त्या ठाण्याला परत जाण्यासाठी महामार्ग बसस्थानकात (सेंट्रल बस स्टँड) पोहोचल्या.
नाशिक-ठाणे या बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा संशयित महिला आशा लोंढे हिने घेतला. तिने अत्यंत चालाखीने शिंदे यांच्या पर्समधील मिनी पाकीट चोरून नेले. या पाकिटात सुमारे साडेचार ते पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र होते. बसमध्ये बसल्यानंतर पर्सची साखळी उघडी असल्याचे आणि पाकीट चोरीला गेल्याचे शिंदे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने मुंबईनाका पोलीस ठाणे गाठून चोरीचा गुन्हा दाखल केला.
सीसीटीव्ही फुटेज ठरले गेमचेंजर
गुन्हा दाखल होताच मुंबईनाका पोलिसांच्या पथकाने महामार्ग बसस्थानक गाठले. पोलिसांनी स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यात एक संशयास्पद महिला धावपळ करताना आणि गर्दीचा फायदा घेताना दिसून आली. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तिचा शोध सुरू केला असता, ती त्र्यंबक नाका भागात फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ सापळा रचून तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली व तिच्याकडून सव्वा दोन लाखांचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.
'या' पथकाने केली कामगिरी
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख व पोलीस निरीक्षक पंडित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील, अंमलदार आकाश सोनवणे, दीपक जगदाळे, योगेश अपसुंदे, समीर शेख, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले, अमित तिडके, श्रीकांत कर्पे, जुबेर सैय्यद व प्रेरणा शेळके आदींच्या पथकाने केली.