मुलीच्या छेडछाडीवरून राडा... तरुणाला पडक्या घरात दिला चोप... ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर बाजारात हल्ला...

Share:
Main Image
Last updated: 14-Jun-2026

सुरगाणा, (प्रतिनिधी) १४ जून - मुलीची छेड काढल्याची पोलिसात वारंवार तक्रार दिल्याचा राग मनात धरून एका टोळक्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला बाजारपेठेत गाठून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना बाऱ्हे (ता. सुरगाणा) येथे घडली आहे. तर दुसऱ्या बाजूला, मुलीची छेड काढणाऱ्या तरुणालाही मुलीच्या नातेवाईकांनी लाकडी दांडक्याने चोप दिल्याची घटना घडली आहे. या दोन्ही हिंसक घटनांमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, बाऱ्हे पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतर्फे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही संपूर्ण घटना प्रेमप्रकरणातून आणि छेडछाडीच्या वादातून घडली आहे.

घटना १: छेड काढणाऱ्या तरुणाला पडक्या घरात दिला चोप

गुरटेंभी (ता. सुरगाणा) येथील निलेश हिरामण जाधव (वय १८) हा तरुण संबंधित युवतीची वारंवार छेड काढत असल्याबाबत आधीच पोलिसात तक्रारी दाखल होत्या. असे असतानाही, शुक्रवारी (दि. १२) निलेश हा सर्कलपाडा येथील एका वैरण ठेवलेल्या पडक्या घरात सदर युवतीशी गप्पा मारताना आढळला.

याचा राग आल्याने मुलीचे नातेवाईक गुलाब सखाराम भडांगे आणि प्रेमजीत भडांगे या बाप-लेकाने 'तू येथे का आलास?' अशी कुरापत काढली. तसेच निलेशला जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम चोप दिला. या मारहाणीत निलेश जखमी झाला असून, त्याच्या तक्रारीवरून बाऱ्हे पोलिसांनी भडांगे बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

घटना २: पोलीस तक्रारीचा राग; ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर बाजारात हल्ला

या मारहाणीच्या घटनेनंतर काही वेळातच दुसरा अंक सुरू झाला. ग्रामपंचायत कर्मचारी असलेले गुलाब सखाराम भडांगे (वय ४३, रा. सर्कलपाडा) हे शुक्रवारी दुपारी आपल्या एका सहकाऱ्यासोबत दुचाकीवरून बाऱ्हे गावातून चालले होते.

ते बाजारपेठेतील नारायण हिंडे यांच्या भाजीपाला दुकानासमोर आले असता, आरोपी हिरामण हरी जाधव, युवराज बन्सू जाधव, हिरामण जाधव व त्याचा भाऊ आणि गुरटेंभी येथील इतर ३ ते ४ जणांच्या टोळक्याने त्यांची दुचाकी अडवली. "आमच्या मुलाच्या विरोधात वारंवार पोलिसात तक्रार का देतोस?" असा जाब विचारत या टोळक्याने गुलाब भडांगे यांच्यावर हल्ला चढवला. टोळक्याने त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या झटापटीत भडांगे गंभीर जखमी झाले असून, त्यांचा मोबाईलही गहाळ झाला आहे. गुलाब भडांगे यांच्या तक्रारीवरून या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस तपास सुरू

बाऱ्हे गावातील बाजारपेठेत भरदुपारी झालेल्या या हाणामारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बाऱ्हे पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले असून, पुढील अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक के. के. धुम आणि आर. टी. मेघा करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.