निफाड तालुक्यात सशस्त्र दरोड्याने खळबळ... शस्त्राचा धाक दाखवत दाम्पत्याला कोंडले... इतक्या लाखांची लूट...

Share:
Main Image
Last updated: 14-Jun-2026

निफाड, (प्रतिनिधी) १४ जून - तालुक्यातील नैताळे शिवारातील गाजरवाडी रोडवर शुक्रवारी (दि. १२) पहाटेच्या सुमारास एका सशस्त्र त्रिकुटाने धुमाकूळ घालत दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तोंडाला मास्क लावून आलेल्या या दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत आणि दगडाने मारहाण करत एका दाम्पत्याला लुटले. या धाडसी दरोड्यात ७० हजारांच्या रोकडसह सुमारे १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले असून, दरोडेखोरांनी दाम्पत्याला घरात कोंडून पोबारा केला. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबीबाई साहेबराव तुपलोंढे (वय ५०, रा. गाजरवाडी रोड, नैताळे, ता. निफाड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुपलोंढे दाम्पत्य नैताळे गावापासून काही अंतरावर असलेल्या गाजरवाडी रोड परिसरातील आपल्या घरात वास्तव्यास आहे. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे हे दाम्पत्य झोपी गेले होते.

पहाटेच्या 'साखरझोपेत' घातला दरोडा

पहाटेच्या सुमारास तुपलोंढे दाम्पत्य गाढ झोपेत असताना, तीन अज्ञात दरोडेखोरांनी घराच्या किचनचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. तोंडाला मास्क लावलेल्या या चोरट्यांनी आधी पडवीतील कपाटात ठेवलेली ७० हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा बेडरूममध्ये झोपलेल्या तुपलोंढे दाम्पत्याकडे वळवला.

पतीने विरोध करताच दगडाने प्रहार

दरोडेखोरांनी बेडरूममध्ये प्रवेश करून धारदार शस्त्राचा धाक दाखवला. दोघा संशयितांनी पती साहेबराव तुपलोंढे यांना घट्ट पकडून ठेवले, तर तिसऱ्याने बेबीबाई यांच्या अंगावरील दागिने बळजबरीने ओरबाडण्यास सुरुवात केली. यावेळी पती साहेबराव यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या एका दरोडेखोराने हातातील दगडाने साहेबराव यांच्या कानावर आणि हनुवटीवर जोरदार प्रहार केला. यामध्ये साहेबराव गंभीर जखमी झाले.

घरात कोंडून दरोडेखोर पसार

Advertisement

पती रक्तबंबाळ झाल्याचे पाहून फिर्यादी महिलेने आरडाओरड केली आणि पळून जाणाऱ्या दरोडेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी महिलेला जोरात ढकलून दिले आणि दाम्पत्याला बाहेरून कडी लावून घरात कोंडून टाकले व अंधाराचा फायदा घेत पोबारा केला.

'हा' मुद्देमाल केला लंपास

या सशस्त्र दरोड्यात भामट्यांनी एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लुटला, ज्यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:

रोकड: ७०,००० रुपये नगद

सोन्याचे दागिने: दीड तोळे वजनाची सोन्याची पोत, कानातील टॉप्स आणि वेल, मंगळसूत्र, सोन्याची अंगठी.

चांदीचे दागिने: पायातील तोरड्या.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामीण भागात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास निफाड पोलीस ठाण्याचे हवालदार गणेश गुरव करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.