एस.के. खेडकर, (नाशिक) १४ जून - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या लगबगीचा फायदा उठवत, महावितरण आणि बीएसएनएल (BSNL) कंपन्यांच्या भूमिगत केबल्स (UG Cable) चोरणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा नाशिक शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने नाशिकमधील पाच वेगवेगळ्या भागात चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिक पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी मुंबईतील भांडूप भागात थेट छापा टाकून तब्बल २ कोटी ८८ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही धडक कारवाई शहर गुन्हे शाखेचे युनिट १, गुंडविरोधी पथक आणि अंबड गुन्हे शोध पथकाने संयुक्तपणे केली आहे.
'मोडस ऑपरेंडी': ड्रेनेजची झाकणे उघडून थेट जेसीबीने चोरी!
शहरात एकीकडे रात्रंदिवस विकासकामे सुरू असताना, या टोळीने चोरीचा अजब फंडा शोधला होता. हे चोरटे रात्रीच्या वेळी रस्त्यावरील ड्रेनेजची (मॅनहोल) झाकणे उघडायचे आणि थेट जेसीबी (JCB) मशीनच्या साहाय्याने जमिनीतील महागड्या भूमिगत केबल्स ओढून काढायचे. रातोरात कॉपर (तांबे) आणि ॲल्युमिनियमच्या केबल्स लांबवून ते मुंबईत त्याची तस्करी करायचे. यामुळे महावितरण आणि बीएसएनएल या दोन्ही मोठ्या कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसत होता.
मुंबई आणि बिहारमधील ६ सराईत चोरट्यांना बेड्या
नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीचा तपास करत असताना पोलिसांनी खालील संशयितांना जेरबंद केले:
१. वा हाब अब्दुल नवाज (३५, रा. भांडूप, मुंबई)
२. सुरेश दिलीप वैराळ (३७, रा. भांडूप, मुंबई)
३. बसंतलाल राजाराम यादव (३८, रा. चेंबूर, मुंबई)
४. कमलेशकुमार सुखदेव रविदास (२६, रा. सेरपूर, बिहार)
५. तनवीर मुफसीर शेख (३१, रा. गावदेवी रोड, भांडूप)
६. राजकुमार केशुलाल जैन (५०, रा. व्हिलेज रोड, भांडूप - स्क्रॅप व्यावसायिक)
शहरात 'या' ५ ठिकाणी घातला होता दरोडा
संशयितांनी नाशिकरोड पोलिसांच्या कोठडीत असताना केवळ नाशिकरोडच नव्हे, तर सिंहस्थ कामांच्या गर्दीचा फायदा घेत सरकारवाडा, मुंबई नाका, इंदिरानगर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही अशाच प्रकारे केबल चोरल्याची कबुली दिली.
भांडूपच्या गोदामातून ३३ टन ऐवज जप्त!
नाशिकरोड कारागृहातून इंदिरानगर पोलिसांनी या संशयितांचा ताबा घेतला आणि त्यांची कसून चौकशी केली. संशयित राजकुमार जैन याच्या मुंबईतील भांडूप येथील गोदामावर पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांचे डोळे पांढरे झाले. गोदामातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
१७.५ टन: विविध रंगांच्या अखंड व तुकडे केलेल्या ॲल्युमिनियमच्या केबल्स.
१४.५ टन: जेलीफिल्ड वायर जाळून वेगळे केलेले शुद्ध कॉपर (तांबे).
१.५ टन: इतर ॲल्युमिनियम केबल वायरचे तुकडे.
एकूण जप्त मुद्देमाल: सुमारे ३३.५ टन वजनाचा एकूण २ कोटी ८८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अशी झाली कामगिरी:
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, देविदास ठाकरे, उत्तम पवार, नाझीमखान पठाण, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशी, अंमलदार जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, श्रीकांत सूर्यवंशी, सुनील भोसले, किरण शिरसाठ, दीपक पाटील, दीपक दिवटे, समाधान पवार; गुंड विरोधी पथकाचे उपनिरीक्षक संदीप पवार, राजेश राठोड, कल्पेश जाधव, गणेश भागवत आणि अंबड गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, भूषण सोनवणे व भगवान जाधव यांच्या पथकाने फत्ते केली.