पालकांनो, इकडे लक्ष द्या... या इंग्रजी शाळांमध्ये मुलांचा प्रवेश घेऊ नका... सरकारकडून यादी जाहीर...

Share:
Main Image
Last updated: 14-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १३ जून - नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच मुंबईतील शालेय शिक्षण विभागातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. दक्षिण मुंबई विभागातील काही नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि त्यांमधील काही वर्ग पूर्णपणे बेकायदेशीर आणि अनधिकृतरीत्या चालविले जात असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दक्षिण मुंबई विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी संबंधित शाळांना कडक नोटिसा बजावल्या असून, हे अनधिकृत वर्ग व शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या या यादीत मुंबईतील एकूण ६ शाळा पूर्णपणे अनधिकृत असून, २ नामांकित शाळांमध्ये ठराविक इयत्तेचे वर्ग विनापरवाना चालवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकही वर्गाला मान्यता नसलेल्या 'या' ६ अनधिकृत शाळा:

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खालील शाळांना कोणतीही शासकीय मान्यता नाही:

१. मदनी हायस्कूल – क्रॉफर्ड मार्केट, मस्जीद.

२. युसुफ मेहर अली हायस्कूल – नारायण तावडे चौक, तुळशीवाडी, ताडदेव.

३. मदर तेरेसा हायस्कूल – ब्लॉक नं. ११, ९० फीट रोड, धारावी.

४. गणेश विद्यामंदीर – संत कक्कैया मार्ग, धारावी.

Advertisement

५. ऑक्झिलम इंटरनॅशनल स्कूल – बलराम बाबू खाडेकर मार्ग, वडाळा (पूर्व).

६. फिनलँड इंटरनॅशनल स्कूल – माहेश्वरी निकेतन, गोपालराव देशमुख मार्ग.

'या' शाळांमध्ये काही वर्ग अनधिकृत:

काही शाळांना प्राथमिक मंजुरी असली, तरी त्यांनी पुढील वर्गांसाठी परवानगी घेतलेली नाही. अशा शाळांची नावे खालीलप्रमाणे:

मोहम्मदीया हायस्कूल (२७, मस्जीद मार्ग): या शाळेत केवळ इयत्ता १ ली ते ५ वी आणि ९ वी ते १० वी पर्यंतच्या वर्गांनाच मान्यता आहे. येथील इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे वर्ग पूर्णपणे अनधिकृत आहेत.

गोल्डन स्पायरल हायस्कूल (परेल/ताडदेव): या शाळेत इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतच्या वर्गांना मान्यता आहे. मात्र, पुढील इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतचे वर्ग अनधिकृतरीत्या चालवले जात आहेत.

पालकांना आवाहन

शिक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या पाल्यांचा प्रवेश घेताना संबंधित शाळा आणि वर्गांना शासनाची योग्य मान्यता आहे की नाही, याची खात्री पालकांनी करून घ्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

Advertisement

Comments

No comments yet.