नाशिकमध्ये 'बंटी-बबली' वकील दांपत्याला बेड्या... असा केला कोट्यवधींचा भूखंड घोटाळा...

Share:
Main Image
Last updated: 13-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १३ जून - जमिनीच्या मूळ मालकाऐवजी बनावट (डमी) व्यक्ती उभी करून, शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार करत कोट्यवधी रुपयांचे भूखंड परस्पर लाटणाऱ्या एका हायप्रोफाइल 'बंटी-बबली' टोळीचा इंदिरानगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पेशाने वकील असलेल्या या भामट्यांनी चक्क महाराष्ट्र शासनाचे बनावट राजपत्र (गॅझेट) आणि बनावट आधारकार्डचा वापर करून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (DB Team) या संशयित दांपत्याला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून अटक केली असून, प्राथमिक तपासात त्यांनी असे ५ गंभीर गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. कपिल अरविंद पाठक आणि अलमास करीम सय्यद (दोघे रा. रिकोन एम्पीरीया अपार्टमेंट, खोडेनगर, वडाळा शिवार, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित वकिलांची नावे आहेत.

अशी होती गुन्ह्याची 'मोडस ऑपरेंडी' (कार्यपद्धती):

पोलिस तपासात या टोळीच्या फसवणुकीची अत्यंत धक्कादायक पद्धत समोर आली आहे:

१. प्लॉटची टेहळणी: संशयित नाशिकमधील मोक्याच्या आणि रिकाम्या भूखंडांची माहिती काढायचे.

२. बनावट राजपत्र (Gazette): नावात बदल करण्यासाठी हे संशयित वकील सरकारचे बनावट राजपत्र तयार करायचे.

३. आधारकार्डमध्ये फेरफार: या बनावट पत्राच्या आधारे डमी व्यक्तीच्या आधारकार्डवर मूळ जमीन मालकाचे नाव आणि पत्ता टाकून ते अपडेट केले जायचे.

४. बँक खाते आणि विक्री: याच बनावट आधारकार्डच्या आधारे बँकेत खाते उघडून, खरेदीदाराला फसवून भूखंडाची परस्पर विक्री केली जायची आणि पैसे लाटले जायचे. यामध्ये मूळ मालक आणि खरेदीदार अशी दुहेरी फसवणूक केली जात होती.

'या' दोन मोठ्या भूखंडांवर मारला डाका

इंदिरानगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी वेगवेगळ्या दोन फसवणुकीच्या तक्रारी दाखल होत्या.

Advertisement

चेतनानगर परिसर: येथील संतोष संजीवा हेगडे यांच्या मालकीचा सर्व्हे नं. ८८९ मधील ५०१ चौ. मीटरचा प्लॉट नंबर १.

वडाळागाव शिवार: येथील सुधीर जमनादास गुजराथी यांच्या मालकीचा सर्व्हे नं. १०३ मधील १९० चौ. मीटरचा प्लॉट नंबर १०.

हे दोन्ही महागडे भूखंड या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विकून करोडोंची माया गोळा केली होती.

गुन्ह्यातील १४ जणांवर कारवाई; दोघे होते फरार

या संपूर्ण कटकारस्थानात तब्बल १४ जणांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यातील बहुतांश आरोपी सध्या तुरुंगात आहेत. मात्र, मुख्य सूत्रधार असलेले कपिल पाठक आणि अलमास सय्यद हे गुन्हे दाखल होताच नाशिकमधून पसार झाले होते. ते भिवंडीत लपून बसल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना बेड्या ठोकल्या.

पोलिसांचे जाहीर आवाहन

"संशयित बंटी-बबली वकील जोडीने बनावट कागदपत्रांच्या आधारे नाशिकमध्ये मोठी मालमत्ता गोळा केली आहे. या संशयितांनी अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास, त्यांनी तातडीने इंदिरानगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा."

— इंदिरानगर पोलिस प्रशासन, नाशिक.

अशी झाली कारवाई:

ही यशस्वी कारवाई नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे व निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष फुंदे, हवालदार पवन परदेशी, अमजद पटेल, सागर परदेशी, कुलदीप पवार, अंमलदार योगेश जाधव, सागर कोळी, अमोल कोथमिरे, सौरभ माळी, वाल्मिक पाटील, राहुल धोंगडे, प्रमोद कासुदे, दीपक शिंदे व शामल जोशी यांच्या पथकाने केली.

Advertisement

Comments

No comments yet.