मुंबई, (विशेष प्रतिनिधी) १२ जून - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधून प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या प्रवासी सवलतींच्या लाभामध्ये अधिक पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आगामी १ ऑगस्ट २०२६ पासून या सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, या निर्णयामुळे तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे.
५१ लाख नागरिकांची नोंदणी; २५ लाख कार्डे सक्रिय
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला मोठी गती आली आहे. महामंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार:
आजअखेर राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी या स्मार्ट कार्डसाठी आपली नोंदणी पूर्ण केली आहे.
त्यापैकी सुमारे २५ लाख स्मार्ट कार्ड यशस्वीरीत्या कार्यान्वित (Activate) करण्यात आले आहेत.
उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने, सर्व पात्र प्रवाशांनी कोणताही विलंब न करता आपली प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
४,००० हून अधिक केंद्रांवर वितरण सुरू; गैरव्यवहार केल्यास कारवाई!
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे, यादृष्टीने हे नियोजन करण्यात आले आहे.
जादा पैसे उकळणाऱ्या केंद्रांचा परवाना होणार रद्द!
दरम्यान, या स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि अशा केंद्रांचा वितरण परवाना तात्काळ रद्द करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
१ ऑगस्टपूर्वी कार्ड मिळवण्याचे आवाहन
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ सुरक्षितपणे आणि सुळीतपणे मिळावा, हाच या आधुनिक प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे संबंधित सर्व लाभार्थ्यांनी १ ऑगस्टपूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.