मुंबई, (प्रतिनिधी) १२ जून - राज्यातील सर्वसामान्यांना दर्जेदार, अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या एमआरआय (MRI), सीटी स्कॅन (CT Scan) आणि पीईटी सीटी स्कॅन (PET CT Scan) प्रकल्पांच्या प्रगतीचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयातील बैठकीत सविस्तर आढावा घेतला. रुग्णांना या अत्याधुनिक निदान सुविधा वेळेत मिळणे आवश्यक असून, मुंबई आणि नागपूर क्लस्टरमधील या प्रकल्पांचे सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, असे कडक निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता ऑनलाईन हजर
या उच्चस्तरीय आढावा बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी आणि ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (मुंबई) अधिष्ठाता प्रत्यक्ष उपस्थित होते. तर, राज्यातील प्रमुख १५ हून अधिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) या बैठकीत सहभागी झाले होते.
यात प्रामुख्याने खालील जिल्ह्यांचा समावेश होता:
पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मिरज, बारामती.
धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, अंबाजोगाई.
नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला आणि सिंधुदुर्ग.
रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य
बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "कोणत्याही आजाराचे अचूक आणि वेळेवर निदान होण्यासाठी एमआरआय, सीटी स्कॅन आणि पीईटी सीटी स्कॅन या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असतात. राज्यातील गरीब व सर्वसामान्य रुग्णांना या सेवा अधिक प्रभावीपणे आणि वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन सुविधांचा विस्तार, त्यांची नियमित देखभाल आणि कार्यक्षम अंमलबजावणी यावर यंत्रणांनी विशेष भर दिला पाहिजे."
शासकीय रुग्णालयांमध्ये उभारण्यात येत असलेले हे अत्याधुनिक 'पीपीपी' प्रकल्प वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, यामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागातील रुग्णांनाही मोठ्या शहरांप्रमाणेच गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा अत्यंत माफक दरात मिळतील.