द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात... उलट्या दिशेने येणाऱ्या स्कूल बसने टेम्पो ट्रॅव्हलरला उडवले...

Share:
Main Image
Last updated: 11-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ जून - शहरातील अत्यंत गजबजलेल्या द्वारका भागातील उड्डाणपुलावर आज, गुरुवारी (दि. ११) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद असतानाही, चक्क विरुद्ध दिशेने (रॉंग साईड) जाणाऱ्या एका स्कूल बसने विंगर टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात विंगरमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरातील शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 नियम तोडले आणि घात झाला!

द्वारका परिसरामध्ये सध्या सातत्याने विकासकामे सुरू आहेत. भुयारी मार्गाच्या कामामुळे हा विशिष्ट रस्ता वाहतुकीसाठी अधिकृतपणे बंद करण्यात आला आहे. असे असतानाही अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून या उड्डाणपुलावर जाण्याचा धोकादायक प्रयत्न करतात. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजू खुल्या असल्याचा गैरफायदा चालकांकडून घेतला जात आहे.

आज सकाळी साडेसहाच्या सुमारास, एमएच १५ ईएफ ०१५८ क्रमांकाची स्कूल बस द्वारका उड्डाणपुलावरून उलट्या दिशेने एनडीसीसी (NDCC) बँकेच्या बाजूने खाली उतरत होती. याच वेळी उड्डाणपुलावरून द्वारकाच्या दिशेने येत असलेल्या एमएच २० बीसी ७२६४ क्रमांकाच्या विंगर टेम्पो ट्रॅव्हलरची आणि बसची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Advertisement

जखमींवर उपचार सुरू; परिसरात वाहतूक कोंडी

हा अपघात इतका भीषण होता की विंगर टेम्पो ट्रॅव्हलरचे मोठे नुकसान झाले असून, त्यातील प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले. या अपघातानंतर नाशिक-मुंबई महामार्गावरील द्वारका परिसरातील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक पूर्ववत केली असून, या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

नागरिकांमध्ये तीव्र संताप

द्वारका उड्डाणपुलावर वारंवार होणारे अपघात आणि वाहनचालकांकडून होणारे वाहतुकीच्या नियमांचे उघड उल्लंघन यामुळे नाशिककरांमधून तीव्र चिंता आणि संताप व्यक्त केला जात आहे. "नो एन्ट्री" असताना आणि रस्ता बंद असतानाही स्कूल बस थेट उड्डाणपुलावर उलट्या दिशेने कशी काय धावू शकते? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.