व्हॉट्सॲप कॉलद्वारे मागितली १ लाख २० हजारांची लाच... असे सापडले जाळ्यात...

Share:
Main Image
Last updated: 11-Jun-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ११ जून - भूसंपादनाचा प्रलंबित मोबदला आणि फंड ट्रान्सफर ऑर्डर (FTO) मंजूर करून देण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महसूल साहाय्यकासह एका कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) नाशिक परिक्षेत्राच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर पथकाने ही धडक कारवाई केली.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे:

१. मंगेश विजय दुमणे (महसूल साहाय्यक, तत्कालीन नेमणूक- उप विभागीय अधिकारी कार्यालय, श्रीगोंदा-पारनेर विभाग, सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर).

२. अमोल कानिफनाथ खामकर (कंत्राटी कर्मचारी, उप विभागीय अधिकारी कार्यालय, श्रीगोंदा-पारनेर विभाग, जि. अहिल्यानगर).

काय आहे नेमके प्रकरण?

Advertisement

तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांची मौजे जंगलवाडी (ता. श्रीगोंदा) येथील गट नं. १३ मधील १४३ गुंठे जमीन राष्ट्रीय महामार्ग-५४८ D मध्ये रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी शासनाने भूसंपादन केली आहे. या भूसंपादनाची नुकसान भरपाई म्हणून तक्रारदारांना शासनाकडून अंतिम व पुरवणी अवॉर्डप्रमाणे १ कोटी ४७ लाख रुपये मंजूर झाले होते.

हा प्रलंबित निधी बँक खात्यात वर्ग करण्यासाठी आवश्यक असलेली 'फंड ट्रान्सफर ऑर्डर' (FTO) उपविभागीय अधिकारी कार्यालयातून मंजूर करून देण्यासाठी संशयित मंगेश दुमणे आणि अमोल खामकर यांनी तक्रारदाराकडे वेळोवेळी लाचेची मागणी केली. ४ मे २०२६ रोजी संशयित लोकसेवक दुमणे याने थेट व्हॉट्सॲप कॉल करून, "जर पैसे दिले, तरच एफ.टी.ओ. लगेच हातात देतो. एफ.टी.ओ. जनरेट करण्यासाठी साहेबांना पैसे द्यावे लागतील," असे सांगत १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितली.

लाचेची मागणी पडताळणीत निष्पन्न

तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती. त्यानुसार ६ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान, संशयित मंगेश दुमणे आणि अमोल खामकर यांनी तक्रारदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. या पडताळणीच्या आधारे १० जून २०२६ रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ५४६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे व त्यांच्या पथकातील पोकॉ गजानन गायकवाड, पोकॉ सचिन सुद्रुक, पोकॉ वैभव सुपेकर यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उप अधीक्षक श्री. अजित त्रिपुटे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.