सटाणा, (प्रतिनिधी) १० जून - नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज एक मोठी कारवाई करत एका महिला तलाठ्याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. कर्जमाफीचा बोजा कमी करणे आणि सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या कारवाईमुळे नाशिक जिल्हा महसूल विभागात आणि लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
लाचखोर लोकसेवकाचे नाव
मनिषा नारायण बाविस्कर (वय ३६)
पद: ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ब्राह्मणगाव, ता. सटाणा, जि. नाशिक (वर्ग-३)
सध्याचे राहणारे: साठ फुटी रोड, सटाणा.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार यांचे मौजे ब्राह्मणगाव येथे शेत गट क्र. ८२४ मधील क्षेत्रावर भाऊसाहेब हिरे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित, ब्राह्मणगाव यांच्याकडून ४,००,००० रुपयांचा कर्ज बोजा चढवला होता. हे कर्ज माफ झाले होते, परंतु सातबारा उताऱ्यावरून त्याचा बोजा कमी झाला नव्हता. यासोबतच याच गट नंबरवर वारस नोंदीच्या वेळेस तक्रारदार यांचे नाव वेगळे नमूद झाले होते, त्यात कागदपत्रांप्रमाणे बदल करून मिळण्यासाठी तक्रारदाराने २६/०३/२०१५ आणि १५/०४/२०२६ रोजी अर्ज केले होते.
या दोन्ही कामांसाठी तलाठी मनिषा बाविस्कर हिने स्वतःसाठी व मंडळ अधिकारी यांच्यासाठी एकूण १०,००० रुपयांच्या लाचेची मागणी १६/०४/२०२६ रोजी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार नोंदवली.
तहसील कार्यालयात रचला सापळा
तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने २७/०४/२०२६ रोजी सटाणा येथील जिजामाता मराठा हायस्कूल आणि त्यानंतर सटाणा तहसीलदार कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी केली. यावेळी मनिषा बाविस्कर हिने लाचेची मागणी मान्य केली. त्यानंतर २८/०४/२०२६ रोजी पुन्हा पडताळणी केली असता, मंडळ अधिकाऱ्यांनी थेट लाचेची मागणी केली नसल्याचे निष्पन्न झाले, मात्र महिला तलाठी लाचेच्या मागणीवर ठाम होती.
अखेर ०९ जून २०२६ रोजी सटाणा तहसीलदार कार्यालय परिसरात एसीबीने सापळा कारवाईचे आयोजन केले होते. तक्रारदाराकडून १०,००० रुपयांची लाचेची रक्कम (ज्यामध्ये ५०० रुपयांच्या २० चलनी नोटा होत्या) पंचांसमक्ष स्वीकारताना महिला तलाठी मनिषा बाविस्कर हिला लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई करणारे पथक
सापळा अधिकारी: स्वाती पवार (पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक)
तपास अधिकारी: रुपाली खांडवी (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक)
कारवाई पथक: पोलीस हवादार शरद हेंबाडे, युवराज खांडवी, चालक पोलीस हवादार विनोद पवार (सर्व नेमणूक - ला.प्र.वि. नाशिक)
मार्गदर्शन:
ही धडक कारवाई ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. माधव रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन:
कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी ला.प्र.वि. नाशिक कार्यालय (तिबेटियन भाजीपाला मार्केटजवळ, शरणपूर रोड, नाशिक) येथे किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.