तरुणांना स्वयंरोजगाराची मोठी संधी... १५ जूनपासून अर्ज सुरू... पात्रतेचे निकष आणि निवड पद्धती अशी...

Share:
Main Image
Last updated: 10-Jun-2026

जळगाव, (प्रतिनिधी) १० जून - आजच्या वेगाने बदलणाऱ्या शैक्षणिक आणि सामाजिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक ताणतणाव, भावनिक समस्या, सोशल मीडिया व डिजिटल व्यसन आणि करिअरविषयक संभ्रम यांसारख्या अनेक मानसिक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हीच गरज ओळखून महाराष्ट्र शासनाच्या 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी' (AMRUT - अमृत) संस्थेच्या वतीने एक नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 'अमृत' संस्थेमार्फत "अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम" राबविण्यात येत असून, मानसशास्त्र, समुपदेशन आणि सामाजिक कार्य (Social Work) क्षेत्रातील युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार आणि व्यावसायिक विकासाची मोठी संधी उपलब्ध करून दिली जात आहे.

प्रशिक्षणाची उद्दिष्टे आणि करिअरच्या संधी

या कार्यक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि जीवनकौशल्य विकासासाठी तज्ज्ञ व प्रशिक्षित समुपदेशक (मानसमित्र) तयार करण्यात येणार आहेत. हे मोफत प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना "अमृत मानसमित्र समुपदेशक" हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

प्रशिक्षणानंतर कुठे मिळू शकते संधी?

शाळा व महाविद्यालयीन समुपदेशक आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी.

जीवनकौशल्य प्रशिक्षक व मानसिक आरोग्य जनजागृती समन्वयक.

पालक व शिक्षक कार्यशाळा समन्वयक.

स्वयंरोजगाराच्या माध्यमातून वैयक्तिक समुपदेशन सेवा.

Advertisement

पात्रतेचे निकष आणि निवड पद्धती

प्रत्येक जिल्ह्यातील गरज, विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध संसाधनांचा विचार करून प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली जाईल. प्रत्येक बॅचमध्ये किमान २० ते कमाल ३० उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.

शैक्षणिक पात्रता: एम.ए. / एम.एस्सी. (मानसशास्त्र), एम.ए. / एम.एस्सी. (समुपदेशन मानसशास्त्र) किंवा 'मास्टर ऑफ सोशल वर्क' (MSW) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे: 'अमृत'च्या लक्षित गटातील उमेदवार असल्याचे पुरावे (डोमेसाईल प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा पुरावा) जोडणे अनिवार्य आहे.

१५ जूनपासून ऑनलाईन अर्ज; 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य'

या प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचसाठी १५ जून ते २२ जून २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांना ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ (First Come First Served) या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 'अमृत' संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर https://mahaamrut.org.in/ जाऊन ऑनलाईन अर्ज करावा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अर्जांच्या छाननीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना ईमेल किंवा मेसेजद्वारे प्रवेशाबाबत कळविले जाईल. दिलेल्या मुदतीत प्रवेश न घेतल्यास प्रतीक्षा यादीतील (Waiting List) उमेदवारांना संधी दिली जाईल.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अमृत संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन 'अमृत'चे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.