नाशिक, (प्रतिनिधी) ९ जून - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविक व पर्यटकांना दर्जेदार आणि व्यावसायिक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पर्यटन क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे, या उद्देशाने पर्यटन संचालनालयाच्या वतीने 'पर्यटन मार्गदर्शक' (Tourism Guide) हा विशेष व मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आया आहे. पर्यटन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे नाशिक येथील उपसंचालक यांनी केले आहे.
ग्वाल्हेरच्या नामांकित संस्थेत मिळणार धडे!
हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नामांकित 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट' (IITTM), ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये निवडक उमेदवारांना खालील तांत्रिक व व्यावसायिक कौशल्यांचे प्रगत प्रशिक्षण दिले जाईल:
पर्यटन मार्गदर्शनाची मूलतत्त्वे आणि पर्यटक व्यवस्थापन.
वारसा, इतिहास व सांस्कृतिक पर्यटन.
संवाद कौशल्य (Communication Skills) आणि व्यक्तिमत्त्व विकास.
ग्राहक सेवा, पर्यटनविषयक कायदे व नियम.
कुंभमेळ्यासारख्या महासोहळ्यात भाविकांना प्रभावी मार्गदर्शन करण्याची कौशल्ये.
प्रशिक्षण शुल्क, निवास व भोजन पूर्णपणे मोफत!
या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांचे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क, तेथील निवास व्यवस्था (राहणे) आणि भोजनाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत केला जाणार आहे. उमेदवारांना केवळ ग्वाल्हेर येथे जाण्या-येण्याचा प्रवास खर्च स्वतः करावा लागणार आहे. या प्रशिक्षणामुळे आगामी कुंभमेळ्यात सक्षम मार्गदर्शकांची मोठी फळी तर तयार होईलच, सोबतच स्थानिक तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
येथे साधा संपर्क:
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती व नोंदणीसाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला maharashtratourism.gov.in भेट द्यावी. याशिवाय ८३९०७३१७३७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच 'उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदानाजवळ, नाशिक' येथे प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.