एसटी बसस्थानक परिसरात २०० मीटर असेल हा झोन... पोलीस आणि आरटीओ करणार कडक कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 09-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ९ जून - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नाला लागलेला अवैध प्रवासी वाहतुकीचा मोठा फटका लक्षात घेता, प्रवाशांची सुरक्षितता, वाहतूक शिस्त आणि एसटीच्या महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने नाशिक विभागात सध्या धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख बसस्थानकांपासून २०० मीटर परिसरात 'नो पार्किंग झोन'ची कडक अंमलबजावणी केली जात असून, ४ जूनपासून सुरू झालेली ही विशेष मोहीम येत्या १५ जूनपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्य परिवहन नाशिक विभागाचे वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी भगवान घुगे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानंतर राज्यातील सर्व विभागांना आदेश

अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या महसुलात मोठी घट होत असल्याचे एसटीचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध बैठकांमध्ये निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्वच विभागांना ही विशेष मोहीम राबविण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेंतर्गत बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर स्थानिक पोलीस आणि आरटीओच्या (RTO) सहकार्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात २८ बसस्थानकांवर विशेष लक्ष

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षक माधुरी सोनार या कारवाईसाठी विशेष सहकार्य करीत असून, मोहिमेच्या सुरुवातीलाच ४ व ५ जून रोजी ६ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात ही मोहीम वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी भगवान घुगे आणि विभाग नियंत्रक सचिन शिरसागर यांच्या नेतृत्वाखाली विभागीय वाहतूक अधिकारी, सर्व आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख तसेच स्थानिक पोलीस यांच्या समन्वयातून अत्यंत प्रभावीपणे राबविली जात आहे.

'या' बसस्थानक परिसरांचा समावेश:

Advertisement

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नाशिक विभागातील खालील बसस्थानक परिसरात 'नो पार्किंग झोन'ची कडक अंमलबजावणी केली जात आहे:

नवीन मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस), मेळा बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, नाशिकरोड, त्र्यंबकेश्वर, सातपूर, येवला, सटाणा, देवळा, नामपूर, ताहाराबाद, मनमाड, चांदवड, नांदगाव, सिन्नर, नांदुरशिंगोटे, लासलगाव, निफाड, कळवण, वणी, नांदुरी, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, इगतपुरी, घोटी, मालेगाव आणि पिंपळगाव.

अवैध वाहतूकदारांनी बसस्थानक परिसरात वाहने उभी करून प्रवाशांची वाहतूक केल्यास त्यांच्यावर यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा एसटी प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

एसटीची 'दक्षता' मोहीम:

कालावधी: ४ जून ते १५ जून २०२६ पर्यंत जिल्ह्यात विशेष मोहीम.

उद्देश: प्रवाशांची सुरक्षितता, वाहतुकीला शिस्त लावणे आणि एसटीच्या उत्पन्नात वाढ करणे.

संयुक्त कारवाई: एसटीचे दक्षता पथक, स्थानिक पोलीस आणि आरटीओ (RTO) यांचे संयुक्त पथक मैदानात.

न्यायालयाचा आदर: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानकांपासून २०० मीटरचा परिसर 'नो पार्किंग'.

Advertisement

Comments

No comments yet.