अमळनेर-धुळे रस्त्यावर काळाचा घाला... एसटी बस, कार आणि दुचाकीचा भीषण तिहेरी अपघात... ६ जण जागीच ठार..

Share:
Main Image
Last updated: 09-Jun-2026

अमळनेर, (प्रतिनिधी) ९ जून - अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ गावानजीक असलेल्या हॉटेल वृंदावनजवळ आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि थरारक तिहेरी अपघात घडला. एसटी बस, कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या या विचित्र अपघातात ६ जण जागीच ठार झाले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातामुळे अमळनेर-धुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूककोंडी झाली होती.

गुजरात पासिंग कारने तिन्ही वाहनांना चिरडले!
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी बस, एक कार आणि मोटरसायकल ही तिन्ही वाहने अमळनेरकडून धुळ्याच्या दिशेने जात होती. याच वेळी समोरून, म्हणजेच धुळ्याकडून येणाऱ्या एका भरधाव गुजरात पासिंग कारने (क्र. GJ 19 AF 3147) या तिन्ही वाहनांना समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण आणि वेगवान होती की, यामध्ये मोटरसायकलचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुचाकीवर प्रवास करणारे धरणगाव येथील रहिवासी असलेले दुचाकीस्वार जागीच ठार झाले. तसेच धडक देणाऱ्या कारमधील महिला आणि पुरुषांसह एकूण ६ जणांचा जागीच करुण अंत झाला.

Advertisement

कारचा चक्काचूर; चिमुरड्याचा जीव वाचला!
अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. अपघातानंतर एक लहान मुलगा कारच्या ढिगाऱ्यातच अडकून पडला होता, तर एसटी बसमधील अनेक प्रवासीही जखमी झाले होते. अपघाताचा भीषण आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थ, महामार्गावरून जाणारे इतर चालक आणि एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या त्या चिमुरड्याला आणि इतर जखमींना ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने सुखरूप बाहेर काढले. जखमींना तातडीने उपचारासाठी गुजरात येथील व्यारा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

पोलिसांची धाव; मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने क्रेनद्वारे अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्त्यावरील वाहतूककोंडी पूर्ववत केली. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस या भीषण अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.