इतिहासात प्रथमच... त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा कारभार यांच्याकडे...

Share:
Main Image
Last updated: 08-Jun-2026

त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) ८ जून - जागतिक कीर्तीचे देवस्थान आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कारभारात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक बदल झाला आहे. देवस्थानच्या अध्यक्षपदाचा कारभार आता धर्मदाय सहआयुक्त विवेक सोनुने यांनी अधिकृतपणे स्वीकारला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे थेट प्रतिनिधी म्हणून सह धर्मदाय आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हे अध्यक्षपद आले आहे. नुकतीच त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे दाखल होत ट्रस्टच्या अधिकारी वर्गाकडून आपल्या पदाचा रीतसर चार्ज घेतला.

दर्शन घेऊन केली गर्दीची पाहणी

पदभार स्वीकारण्यापूर्वी सह धर्मदाय आयुक्त विवेक सोनुने यांनी श्री त्र्यंबकेश्वराचे भावपूर्ण दर्शन घेतले. सध्या सुरू असलेला उन्हाळा आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मंदिरात होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता, त्यांनी मंदिर परिसराचे आणि रांगांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. कारभार स्वीकारते वेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी आणि इतर मानकरी उपस्थित होते.

१९९४ नंतर देवस्थानच्या रचनेत दुसरा मोठा बदल

Advertisement

श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या व्यवस्थापनाला एक मोठा ऐतिहासिक आणि न्यायालयीन पार्श्वभूमीचा इतिहास आहे:

१९९४ चा निर्णय: सन १९९४ मध्ये प्रथमच त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचा कारभार न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे अध्यक्ष या नात्याने सोपवण्यात आला होता. तेव्हापासून न्यायालयीन अधिकारी याचे अध्यक्षपद पाहत होते.

२०१३ चा न्यायालयाचा आदेश: त्यानंतर २०१३ मध्ये कोर्टाच्या निर्णयानुसार त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त पदांची पुनर्रचना करण्यात आली. या रचनेनुसार सचिव व अध्यक्ष धरून एकूण विश्वस्तांची संख्या ९ निश्चित करण्यात आली आहे. यात त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (CEO) हे पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतात.

पारदर्शक आणि सुलभ कारभारावर भर

आता प्रथमच न्यायमूर्तींऐवजी धर्मदाय सहआयुक्त विवेक सोनुने यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आल्यामुळे देवस्थानच्या प्रशासकीय कामकाजाला एक वेगळी गती मिळण्याची शक्यता आहे. पदभार स्वीकारते वेळी मंदिराचे इतर विश्वस्त आणि अधिकारी उपस्थित होते. आगामी काळात भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, व्हीआयपी संस्कृतीला आळा बळावा आणि मंदिर प्रशासनात अधिक पारदर्शकता यावी, यादृष्टीने नवीन अध्यक्ष काय पावले उचलतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.