नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ९ जून - उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात बळजबरीने आणि कट रचून धर्मपरिवर्तन (Conversion Crime) घडवून आणल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित आणि कोट्यधीश औषध व्यापाऱ्याच्या एकुलत्या एका मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्याचे पूर्णपणे ब्रेनवॉश करून धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर त्याला दिल्लीत नेऊन त्याचा बेकायदेशीरपणे निकाह लावण्यात आला. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी जिम ट्रेनर तरुणी आणि तिच्या वडिलांना अटक केली आहे.
पाकिस्तानी युट्युब चॅनेलद्वारे केले 'ब्रेनवॉश'
शामलीच्या दयानंदनगर भागात राहणारे देवराज सिंह मलिक हे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष असून औषध व्यवसायातील मोठे नाव आहे. त्यांचा २७ वर्षांचा मुलगा आयुष मलिक याने बी. फार्माचे (B.Pharma) शिक्षण पूर्ण केले असून तो वडिलांच्या मोठ्या मेडिकल स्टोअरचे काम पाहत होता.
देवराज सिंह यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा अत्यंत साधा आणि भोळा आहे. गेल्या काही काळापासून त्याने अचानक दाढी वाढवली, डोक्यावर टोपी घालून तो दुकानात बसू लागला आणि दिवसातून पाच वेळा नमाज पठण करू लागला. त्याने आपले नाव बदलून 'रहमान' असे ठेवले. तपासात समोर आले की, आरोपी तरुणीच्या भावाने आयुषच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानातील एका कट्टरपंथीय मुस्लिम नेत्याचे युट्युब चॅनेल आणि पेज सबस्क्राईब करून दिले होते. आयुष दिवसभर त्याच चॅनेलवरील व्हिडिओ पाहायचा, ज्यातून त्याचे पूर्णपणे ब्रेनवॉश करण्यात आले.
फिजियोथेरपी सेंटर ते जिम; अशी झाली ओळख
आयुष आणि मुख्य आरोपी तरुणी चांदनी कुरेशी यांची पहिली भेट एका स्थानिक रुग्णालयातील फिजियोथेरपी सेंटरमध्ये झाली होती. आयुषच्या पायाला दुखापत झाली असल्याने तो उपचारासाठी जात होता, तर चांदनीने फिजियोथेरपिस्टचा कोर्स केला होता. तिथे ओळख झाल्यानंतर दोघेही 'कुरेशी प्लस' नावाच्या जिममध्ये एकत्र जाऊ लागले. चांदनी तिथे जिम ट्रेनर म्हणून काम करायची.
चांदनी ही अत्यंत गरीब कुटुंबातील असून तिचे वडील इस्लाम कुरेशी रस्त्यावर ज्यूसची गाडी लावतात. मात्र, चांदनीने आयुषसमोर श्रीमंत असल्याचा आव आणला. मैत्रीचा फायदा घेऊन तिने आयुषच्या पैशांनी सोन्याची चैन खरेदी केली आणि लाखो रुपये उडवले.
दिल्लीत नेऊन निकाह; ६ महिन्यांतच कुटुंब सोडले
चांदनी आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाने कट रचून २०२३ मध्ये आयुषला दिल्लीला नेले. तिथे त्याचे बळजबरीने धर्मांतर करून चांदनीसोबत निकाह लावून देण्यात आला. या निकाहबद्दल आयुषच्या कुटुंबाला काहीच कल्पना नव्हती. निकाह झाल्यानंतर अवघ्या ६ महिन्यांतच आयुष आपल्या कुटुंबापासून वेगळा झाला आणि त्याने सिलेक्ट विहार कॉलनीमध्ये भाड्याने घर घेऊन चांदनीसोबत राहण्यास सुरुवात केली.
जेव्हा आयुषच्या वडिलांनी या गोष्टीला विरोध केला, तेव्हा चांदनीच्या कुटुंबाने देवराज सिंह यांच्यावरही धर्म बदलण्यासाठी दबाव आणला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. चांदनीचा भाऊ अमन कुरेशी हा देवराज सिंह यांच्याच दुकानात नोकरीला होता, त्यानेच आयुषला इस्लामचे सर्व रीतीरिवाज शिकवले होते.
अब्जावधींची मालमत्ता हडपण्याचा कट; मौलवींवरही गुन्हे
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, चांदनी आणि तिचे कुटुंब आयुषच्या वडिलांच्या अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून होते. संपत्ती हडपण्याच्या उद्देशानेच हा संपूर्ण कट रचण्यात आला होता.
पोलीस कारवाईची सद्यस्थिती:
अटक: उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्म परिवर्तन प्रतिबंधक कायद्याच्या कलमांनुसार जिम ट्रेनर चांदनी कुरेशी आणि तिचे वडील इस्लाम कुरेशी यांना अटक करण्यात आली आहे.
एकूण आरोपी: या प्रकरणी एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये चांदनीच्या कुटुंबातील ६ सदस्य आणि ३ मौलवींचा समावेश आहे.
फरार: सध्या ८ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तसेच एका स्थानिक डॉक्टर खुर्शीद अनवर यांच्या भूमिकेचीही पोलीस कसून चौकशी करत आहेत.