धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात अश्लील नाचगाण्याचा 'छमछम'... नागरिकांमधून तीव्र संताप...

Share:
Last updated: 08-Jun-2026

नांदेड, (प्रतिनिधी) ८ जून - सध्या अधिक मासानिमित्त सर्वत्र धोंडे जेवणाचे कार्यक्रम आयोजित करण्याची राजकारण्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे. त्यातच नुकतीच विधान परिषदेची निवडणूक पार पडल्याने या राजकीय धोंडे जेवणांना मोठा बहर आला आहे. मात्र, लोहा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शरद पवार यांनी आयोजित केलेल्या धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात चक्क नृत्यांगना नाचवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे लोहा शहरासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अधिक मासासारख्या पवित्र आणि धार्मिक महिन्यात थेट व्यासपीठावर अश्लील हावभाव करत नृत्यांगणा नाचवल्या गेल्याने नगराध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल लोह्यात तीव्र संताप पसरला आहे.

चिखलीकरांची पाठ फिरताच अश्लील नृत्याला सुरुवात!

लोहा नगरपरिषद ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून नगराध्यक्ष शरद पवार हे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ५ जून रोजी आयोजित या धोंडे जेवणाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या मुख्य व्यासपीठावर लावलेल्या मोठ्या फ्लेक्सवर चिखलीकर, त्यांचे चिरंजीव प्रवीण चिखलीकर आणि स्वतः नगराध्यक्ष शरद पवार यांचे भले मोठे फोटो झळकत होते.

Advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य पाहुणे म्हणून आलेले प्रताप पाटील चिखलीकर हे कार्यक्रम आटोपून व्यासपीठावरून निघून गेले. मात्र, चिखलीकरांची पाठ फिरताच या धार्मिक कार्यक्रमाला थेट नाचगाण्याचे स्वरूप आले. व्यासपीठावर चक्क ३ ते ४ नृत्यांगनांनी अश्लील हावभाव करत डान्स करण्यास सुरुवात केली. हा हिडीस प्रकार सुरू होताच कार्यक्रमाला आलेल्या अनेक सुजाण नागरिकांनी आणि महिलांनी तिथून तातडीने काढता पाय घेतला.

व्हिडिओ व्हायरल; 'हीच का तुमची संस्कृती?' लोह्यात संतप्त सवाल

व्यासपीठावरील या अश्लील नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, सर्वच स्तरातून या कृत्याचा तीव्र निषेध केला जात आहे. "पवित्र धार्मिक परंपरेचा असा बाजार मांडणे कितपत योग्य आहे? हीच का तुमची संस्कृती?" असा संतप्त सवाल आता लोह्यातील नागरिक उपस्थित करत आहेत.

आपल्या कट्टर समर्थकाच्या कार्यक्रमात असा जाहीर उच्छाद मांडला गेल्याने नेते प्रताप पाटील चिखलीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी कोंडी झाली आहे. दरम्यान, घडलेल्या या संपूर्ण प्रकाराबद्दल अद्याप प्रताप पाटील चिखलीकर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील कोणत्याही बड्या नेत्याने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या एका प्रकारामुळे लोह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.