नाशिक, (प्रतिनिधी) ८ जून - येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत विविध विकासकामांसंदर्भात योजनानिहाय विविध निवेदने सादर केले.
माजी खासदार समीर भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पातून तसेच केंद्रीय राखीव निधीतून येवला मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्ग आणि राज्य मार्ग रस्त्यांच्या सुधारणा व मजबुतीकरणासाठी प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली.मतदारसंघातील वाढती वाहतूक आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता या रस्त्यांचे आधुनिकीकरण व रुंदीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (MSIDC) हायब्रीड अॅन्युटी मेंटेनन्स योजनेत बचत झालेल्या निधीतून लासलगाव व विंचूर परिसरातील विविध अॅप्रोच रस्त्यांची सुधारणा करण्यात यावी,अशी मागणीही त्यांनी केली. या रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिक,शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय नाबार्ड-३१ अंतर्गत येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग तसेच राज्य मार्गांवरील अनेक ठिकाणी पूल बांधकामे व सुधारणा कामे मंजूर करण्याबाबतही निवेदन देण्यात आले. पावसाळ्यात अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याने पूल व जोडरस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी निवेदनाची सकारात्मक दखल घेत मतदारसंघातील विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन दिले. येवला-लासलगाव मतदारसंघातील रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी समीर भुजबळ म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली येवला-लासलगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळणार असून, रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास अधिक वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाच्या विविध योजनांमधून जास्तीत जास्त निधी आणून विकासकामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असेही त्यांनी नमूद केले.