सिन्नरमध्ये उभारणार डबल महाराष्ट्र केसरी... पैलवान हर्षवर्धन सदगीर यांची मोठी घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 08-Jun-2026

सिन्नर, (प्रतिनिधी) ८ जून - कुस्ती क्षेत्रात आपल्या अढळ कर्तृत्वाने नाशिक जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवणारे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन मुकेश सदगीर यांनी क्रीडा क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचे आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आपल्या भागातील, तालुक्या-जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील मातीतील नवोदित पैलवान व खेळाडू घडवण्यासाठी सिन्नर येथे स्वतःच्या नावाचे एक अद्ययावत कुस्ती संकुल उभारण्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली आहे. ‘डबल महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर कुस्ती संकुल, सिन्नर’ या नावाने हे क्रीडा संकुल लवकरच आकारास येणार आहे.

आई-वडील आणि पाठीराख्यांमुळेच इथपर्यंतची वाटचाल

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करताना पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी अत्यंत कृतज्ञता व्यक्त केली आहे. "कुस्ती क्षेत्रात आतापर्यंत सर्व क्रीडाप्रेमींचे मिळालेले आशीर्वाद, हितचिंतकांचे प्रेम आणि मुख्य म्हणजे माझ्या आई-वडिलांनी दिलेल्या खंबीर साथीमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मातीतील कुस्तीला मिळणार हक्काचे व्यासपीठ

Advertisement

ग्रामीण आणि निमशहरी भागातील पैलवानांना अनेकदा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा, आधुनिक प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन वेळेत मिळत नाही. हीच उणीव भरून काढण्यासाठी आणि महाराष्ट्राला भविष्यात अनेक 'महाराष्ट्र केसरी' व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू मिळवून देण्यासाठी हे संकुल अत्यंत मोलाचे ठरणार आहे.

पै. हर्षवर्धन सदगीर यांचे आवाहन:

"आपल्या भागातील ताकदीच्या पोरांना योग्य दिशा मिळावी आणि दर्जेदार खेळाडू घडावेत, म्हणूनच हे छोटसं पाऊल टाकलं आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि पूर्ण ताकदीने मी हे कुस्ती संकुल उभे करणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, माझ्यावर आणि कुस्तीवर मनापासून प्रेम करणारे सर्वच क्षेत्रातील हितचिंतक या कार्यात मला मोलाची साथ देतील यात शंका नाही."

सिन्नरच्या मातीत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल उभे राहणार असल्याने केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील कुस्ती क्षेत्रातून पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्या या निर्णयाचे प्रचंड स्वागत होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.