सरकारी अधिकारी की लाचखोरांचा महामेरु... आलिशान फ्लॅट्स, कोट्यवधींच्या नोटा, सोन्याचे दागिने आणि बेनामी मालमत्तेचे घबाड...

Share:
Main Image
Last updated: 07-Jun-2026

भुवनेश्वर, (वृत्तसंस्था) ७ जून - ओडिशातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Vigilance) भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात एक मोठी आणि धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत शनिवारी एका सहाय्यक कार्यकारी अभियंत्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल २ कोटी रुपयांची रोकड आणि कोट्यवधींची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेले रोकड आणि सोन्याचे घबाड पाहून स्वतः तपास अधिकारीही चक्रावून गेले आहेत. कंधमाल जिल्ह्यातील बालिगुडा येथील 'एकात्मिक आदिवासी विकास संस्थेत' (ITDA) सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या बैकुंठ नाथ बेहरा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती (Disproportionate Assets) बाळगल्याप्रकरणी बेहरा यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.

एकाच वेळी ९ ठिकाणी धाडी

मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने शुक्रवार, ६ जून रोजी अभियंता बैकुंठ नाथ बेहरा यांच्याविरुद्ध सर्च वॉरंट जारी केले होते. या वॉरंटच्या आधारे लाचलुचपत विभागाच्या पथकांनी शनिवारी सकाळी बेहरा यांच्याशी संबंधित ९ वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले.

या ठिकाणी पडले छापे:

भुवनेश्वरमधील नीलाद्री विहार, शैलाश्री विहार, कानन विहार आणि चंद्रशेखरपूर येथील निवासस्थाने.

जाजपूर जिल्ह्यातील धर्मशाळा येथील वडिलोपार्जित घर.

बारीपाडा येथील नातेवाईकांची घरे.

बालिगुडा येथील कार्यालयीन केबिन आणि शासकीय निवासस्थान.

Advertisement

नोटा मोजण्यासाठी मागवाव्या लागल्या मशिन्स!

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेहरा यांच्या घरातील कपाटांची आणि कोपऱ्यांची झडती घेतली असता, त्यांना नोटांचे मोठमोठे बंडल सापडले. घरात लपवून ठेवलेली ही अफाट रोकड पाहून अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले. रोकड एवढी मोठी होती की ती मोजण्यासाठी विशेष मशिन्स मागवाव्या लागल्या. प्राथमिक मोजणीनुसार बँक लॉकर आणि घरातून २ कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

आलिशान घरे आणि गुंतवणुकीचे दस्तऐवज जप्त

केवळ रोख रक्कमच नव्हे, तर या सरकारी बाबूने काळ्या पैशाच्या जोरावर प्रचंड संपत्ती गोळा केल्याचे तपासात उघड झाले आहे. छाप्यादरम्यान खालील मुद्दे समोर आले आहेत:

आलिशान मालमत्ता: भुवनेश्वरसारख्या पॉश भागात अनेक घरे आणि फ्लॅट्स.

दागिने: मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने जप्त.

गुंतवणूक: नामांकित बँकांमधील खाती, फिक्स डिपॉझिट्स (FDs) आणि शेअर्स बाजारामधील मोठ्या गुंतवणुकीचे दस्तऐवज पोलिसांच्या हाती लागले आहेत.

या 'करोडपती' अभियंत्याच्या काळ्या कमाईची आणि लाचलुचपत विभागाच्या या कारवाईची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. लाचलुचपत विभागाकडून बेहरा यांची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

?s=20

Comments

No comments yet.