रुग्णांच्या जीवाशी खेळ... शासकीय रुग्णालयांना पुरवले जात होते हे हातमोजे... असे पडले पितळ उघड...

Share:
Main Image
Last updated: 07-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ७ जून - थेट मलेशियातून परवान्याशिवाय 'विना-निर्जंतुक सर्जिकल ग्लोव्हज' (Non-Sterile Gloves) आयात करून, त्यावर 'निर्जंतुक' (Sterile) असल्याचे खोटे लेबल लावून ते मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील शासकीय रुग्णालयांना पुरवण्याचा एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाने (FDA) उघडकीस आणला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबई, पालघर आणि भिवंडी येथील तीन आस्थापनांवर टाकलेल्या छाप्यात तब्बल ८१ लाख रुपये किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे, तर १ कोटी ३५ लाख रुपये किमतीचे सर्जिकल ग्लोव्हज गुणवत्ता चाचणीसाठी प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

साकीनाक्यातून विना-परवाना आयात; मनपा रुग्णालयांना पुरवठा

FDA च्या पथकाने मुंबईतील मे. साची मेडिक (साकीनाका) या पेढीवर छापा टाकला. या व्यावसायिकाकडे कोणताही वैध परवाना किंवा नोंदणी नसताना त्याने मलेशियातून विना-निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हजची थेट आयात केली होती. हा साठा त्याने वाडा आणि भिवंडी येथील कंपन्यांना पॅकिंग आणि लेबलिंगसाठी पुरवला. धक्कादायक बाब म्हणजे कागदपत्रांच्या पडताळणीत या पेढीने हे निकृष्ट ग्लोव्ह्ज मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना विकल्याचे उघड झाले आहे. या कारवाईत ७४.८५ लाख रुपयांचे ग्लोव्हज जप्त करण्यात आले आहेत.

तसेच, या संस्थेच्या भिवंडीतील कारखान्यावर कारवाई केली असता तिथे 'वैद्यकीय उपकरणे नियम २०१७' चा गंभीर भंग झाल्याचे आढळले. जनस्वास्थ्याचा विचार करून तिथला ९.८८ लाख रुपयांचा साठा प्रतिबंधित करून उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पालघरच्या 'मेडिअर्थ'चा काळाबाजार: मशीन नादुरुस्त, तरीही 'निर्जंतुक'चे शिक्के!

सर्वात भयानक प्रकार पालघर जिल्ह्यातील वाडा येथील मेडिअर्थ लाईफकेअर या कंपनीत समोर आला. या कारखान्यातील निर्जंतुकीकरण (Sterilization) करणारी यंत्रे आणि इतर उपकरणे बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त आहेत. अशाच स्थितीत मालकाने विना-निर्जंतुक ग्लोव्हज खरेदी केले आणि त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते 'स्टेराईल' (निर्जंतुक) असल्याचा खोटा दावा करून शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांना पुरवले.

या कारवाईतील जप्ती:

१.२६ कोटी रुपये किमतीचा विना-निर्जंतुक बँडेज, रोल बँडेज आणि कॉटन गौज साठा विक्रीसाठी प्रतिबंधित.

Advertisement

६.१७ लाख रुपये किमतीची विना-परवाना साठवून ठेवलेली ॲलोपॅथिक औषधे जप्त.

पॅकिंग फाटलेले असल्यास वापरू नका; डॉक्टरांना 'FDA'चे आवाहन

या गंभीर प्रकारानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर्स, रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रुग्णालयांसाठी महत्त्वाची नियमावली:

औषधे किंवा सर्जिकल ग्लोव्ह्ज केवळ अधिकृत आणि परवानाधारक पुरवठादारांकडूनच खरेदी करावेत.

खरेदी करताना उत्पादनावरील परवाना क्रमांक (License No.), बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेटची काळजीपूर्वक पडताळणी करावी.

शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारे ग्लोव्हज Medical Devices Rules 2017 च्या मानकांनुसार आहेत का, याची खात्री करावी.

ग्लोव्हजचे पॅकिंग थोडे जरी फाटलेले असेल, तर ते रुग्णांसाठी वापरणे तातडीने टाळावे.

अशा निकृष्ट उत्पादनांमुळे रुग्णांच्या जिवाला थेट धोका निर्माण होत असल्याने, बेकायदेशीर कंपन्यांविरोधातील ही मोहीम यापुढे अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा एफडीएने दिला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.